रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते तेंव्हा ते इतक्या प्रदीर्घ काळ राष्ट्राध्यक्ष राहतील असे कोणालाच वाटले नव्हते मात्र गेल्या २४ वर्षात पुतीन हे रशियातीलच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली राजकीय व्यक्ती बनले आहे. रशियात सध्या पुतीन यांचा एकहाती अंमल आहे. रशियात त्यांच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवू शकत नाही एकप्रकारे ते रशियाचे हुकूमशहाच आहेत. गेल्या २४ वर्षातील त्यांचा कारभार देखील हेच दर्शवितो अनेकदा त्यांनी फॅसीजमचे उघड समर्थन केले आहे त्यामुळे त्यांनी जिंकलेली निवडणूक ही केवळ औपचारिकता होती. ही निवडणूक केवळ जगाला दाखवण्या पुरतीच होती मुळात तिथे लोकशाहीच आस्तित्वत नसल्याने ही निवडणूक केवळ फार्स असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांकडून विशेषतः युरोपियन देशांकडून केला गेला आणि त्यात तथ्यही आहे अर्थात अशा आरोपांना पुतीन भिक घालत नाही. ते त्यांच्याच तंद्रीत कारभार करणार असे असले तरी त्यांना या नव्या इनिंगमध्ये अनेक नव्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे त्याची सुरुवात देखील झाली आहे. पुतीन यांनी निवडणूक जिंकताच रशियाच्या राजधानीत म्हणजे मॉस्को शहरात इसिस ने दहशतवादी हल्ला घडवून आणला आणि त्यात रशियाचे जवळपास १३३ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला तर ५०० हून अधिक नागरिक जखमी झाले. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर एकाही युरोपियन राष्ट्राने या हल्ल्याचा निषेध देखील केला नाही त्यामुळेच हा हल्ला नक्की इसीसनेच घडवून आणला की त्यांच्या नावावर इतरांनीच हल्ला घडवून आणला अशीही शंका व्यक्त केली जात आहे. अर्थात या हल्ल्यामागील मास्टर माईंड कोण हे पुतीन शोधून काढणारच आणि त्याचा बदला घेणारच हे वेगळे सांगायला नको त्यामुळे आगामी काळात आणखी एका युद्धाला जगाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. त्यातच पुतीन यांनी नाटो देशाला उघड इशारा दिल्याने जगाची चिंता आणखी वाढली आहे. अमेरिकेच्या नादाला लागून रशियाशी शत्रुत्व पत्करलेल्या नाटो देशाला त्याची शिक्षा मिळणारच असा इशारा त्यांनी दिल्याने आगामी काळात युक्रेन प्रमाणे आणखी एखाद्या नाटो देशावर रशिया हल्ला करेल असा अंदाज बांधला जात आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांनी आणि नाटो संघटनेत असलेल्या देशांनी युक्रेनला साथ दिली. यूक्रेनला अमेरिकेने आर्थिक आणि लष्करी सामुग्री पुरवणही रशियाला रोखू शकले नाही. युक्रेनवर हल्ला केल्याने पाश्चिमात्य देशांनी रशियावर कितीतरी आर्थिक प्रतिबंध घातले. परदेशात असलेली रशियाची ४०० अब्ज डॉलर ची संपत्ती गोठवाण्यात आली. रशियावर अनेक आर्थिक प्रतिबंध घातल्या नंतरही रशियाची अर्थव्यवस्था ढासळली नाही उलट अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन यासारख्या प्रगत राष्ट्रांपेक्षा मागील वर्षभरात रशियाचा विकास दर वाढला आहे. आता ते पुन्हा एकदा रशियाच्या सर्वोच्च पदावर बसले आहेत. आणखी किमान सहा वर्ष तरी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत त्यामुळे ते आता आहेत त्यापेक्षाही अधिक शक्तिशाली बनतील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *