लोणावळा : गुड फ्रायडेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ट्रॅफीक जाम झाले. घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी प्रयत्न केले.

दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्या आहेत. गुड फ्रायडेला जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी आल्याने मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने सहकुटुंब फिरायला बाहेर पडले. खंडाळा घाटात शुक्रवारी सकाळपासून वाहतूक ठिकठिकाणी विस्कळीत झाली. वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलीस आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी उपाययोजना केल्या.

पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविली. त्यानंतर सर्व मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सर्व मार्गिकांवरुन सोडण्यात आली. पुण्याकडे जाण्यासाठी मार्गिका उपलब्ध झाल्याने घाट क्षेत्रातील वाहतूक दुपारनंतर सुरळीत झाली. गेल्या आठवड्यापासून उन्हाळा वाढल्याने लोणावळा, पवनानगर, महाबळेश्वर, पाचगणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी सकाळपासून खंडाळा आणि लोणावळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांची वाहने दाखल झाली. लोणावळा शहरात वाहतूक कोंडी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *