ठाणे : सॅटेलाईट संघाने युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाचा १५ धावांनी पराभव करत पदार्पणालाच ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या क गटाचे विजेतेपद संपादन केले. सॅटेलाईट संघाने १७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या युनायटेड पटनी इंड्रस्टीज १५६ धावांवर रोखत अजिंक्यपदावर आपली मोहर उमटवली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिपक गायकवाड, निर्दोश यादव आणि सूरज शर्माने जबाबदारीपूर्ण फलंदाजी करत सॅटेलाईट संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. प्रतिस्पर्ध्यांच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीचा समर्थपणे सामना करताना दिपकने ४३ धावांचे योगदान दिले. निर्दोशने ३८ आणि सूरजने २९ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला.स्पर्धेत सातत्यपूर्ण गोलंदाजी करणाऱ्या ओमर पटनीने या निर्णायक लढतीत ३५ धावांत चार गडी बाद केले. अरमान पठाणने तीन, अश्विन शेळके आणि संदेश कोळीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
उत्तरादाखल हर्षवर्धन पांडेयने आणि पार्थ चंदनने संयमी खेळी करत युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाला विजयाच्या समीप नेले. पण मोक्याच्या क्षणी इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हर्षवर्धनने ५२ धावा केल्या. पार्थने ४६ धावा बनवल्या. अक्रम शेखने तीन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. गोलंदाजीतही छाप पाडताना दिपक गायकवाड आणि शमीत शेट्टीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : : सॅटेलाईट : ३५ षटकात सर्वबाद १७१ (दिपक गायकवाड ४३, निर्दोश यादव ३८, सूरज शर्मा २९, ओमर पटनी ६-३५-४, अरमान पठाण ७-१-२८-३, अश्विन शेळके ६-२९-१, संदेश कोळी ७-२२-१) विजयी विरुद्ध युनायटेड पटनी इंड्रस्टीज : ३४.२ षटकात सर्वबाद १५६ ( हर्षवर्धन पांडेय ५२, पार्थ चंदन ४६, अक्रम शेख ७-१-२६-३, शमीत शेट्टी ७-२१-२, दिपक गायकवाड ४-३५-२).