भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२४
मुंबई : लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. यावेळी बित्तमबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला विविध कार्य क्षेत्रातील नामवंत गुण रत्नांचा मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
लेक लाडकी अभियान हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र सरकार भारत सरकारबरोबर राबवत आहे. ‘मुली वाचवा, मुली वाढवा,’ या संकल्पनेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी समारंभ अध्यक्ष चारुशीला देशमुख, डॉ. मोनिका चोप्रा-जगताप, सौंदर्य तज्ञ स्वाती ओक, मुंबई मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, अभिनेता जाकिर खान , समाजसेविका संगीता ताई गुरव, ह.भ. प. संगीता ताई गुंजाळ हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. प्रत्येक मान्यवरांनी लेक लाडकी अभियान अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर आपापले विचार मांडले या कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष दिपक कलिंगण , पत्रकार व गायक सामाजिक कार्यकर्ते सूरज भोईर, विजय भोसले, देवानंद कांबळे, प्रियांका भोईर,एन.ए.कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या प्रसंगी सल्लागार व अभिनेत्री कलावंत राजश्री काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.