Month: March 2024

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व निरोप समारंभ

केंद्रशाळा पोयरे गांगोरामेश्वर  येथे कै.रामचंद्र हरी राणे स्मरणार्थ ठाणे : जिल्हा परिषद केंद्र शाळा पोयरे गांगोरामेश्वर येथे नुकतेच  मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. श्री जयवंत राणे यांच्यामार्फत  श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या तर  शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने ७वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम.भाग्यश्री सांबारी मॅडम व केंद्रप्रमुख श्री नामदेव सावळे सर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमधील लहान गट पहिली ते चौथी यामधून तीन क्रमांक यात प्रथम क्रमांक कु. मैत्री रणजित घाडी द्वितीय क्रमांक ऋतुराज जयदेव करंदीकर तर तृतीय क्रमांक वेदांत दिपक मेस्त्री याचा आला. मोठा गट यात  पाचवी ते सातवी इयत्ताचा सहभाग होता.प्रथम क्रमांक यश सुनील घाडी द्वितीय क्रमांक राधिका संतोष साळसकर तर तृतिय क्रमांक हर्षदा दिपक मेस्त्री हिचा आला.या सर्व गुणी विद्यार्थ्यांना   मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन करून  कंपास पेटी भेट दिली. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य दिले.. इयत्ता ७ वीचा विदयार्थी मोतीराम साळसकर याने शाळेसाठी समई भेट दिली.कु. तेजल घाडी व कु.हर्षदा मेस्त्री या  विद्यार्थ्यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भाग्यश्री सांबारी मॅडम यांनीही मुलांना छान मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख श्री सावळे सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.वाचनाचे महत्व सांगितले.  वाचाल तर वाचाल,सुसंस्कार याविषयी मार्गदर्शन केले. अशाच स्पर्धा पुढच्याही वर्षी राणे परिवाराच्या वतीने आपण घेऊया असे श्री जयवंत राणे यांनी आवर्जून सांगितले.याचा सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी आनंद झाला.तसेच मुलांना खाऊ ही राणे परिवाराच्या वतीने देण्यात आला. उपशिक्षक श्री उदगीरे सर यांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग आवश्यक आहे असे सांगितले. शाळेच्या भविष्यातील उपक्रमासाठी पालकांनी मदत करावी अशीही विनंती केली.शाळेच्या नावाची एक गोलाकार कमान व संपूर्ण शाळा रंगरंगोटी करून बोलक्या भिंती करावयाच्या आहेत यासाठी दात्यानी सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गोसावी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचलन श्री उदगीरे सर यांनी केले.स्वयंसेविका श्रीम मोरजे मॅडम यांनीही कार्यक्रमाला  मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी उपस्थित केंद्रप्रमुख श्री सावळे सर, सौ.भाग्यश्री सांबारी मॅडम,श्री धोंडू हरी राणे,श्री दाजी हरी राणे,सौ.गोसावी मॅडम, श्रीम.मोरजे मॅडम,शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री रणजित घाडी,उपाध्यक्ष श्रीम.दिव्या मेस्त्री,श्री जयवंत राणे, श्री.सचिन राणे,श्री. दिपक राणे,अंगणवाडी सेविका मालपेकर मॅडम,श्री धोंडू घाडी,सौ.आर्या जयदेव करंदीकर, सौ.मानसी लक्ष्मण घाडी, सौ.जयश्री लक्ष्मण साळसकर, सौ.शारदा संतोष साळसकर, श्रीम.प्रतिक्षा गुणाजी घाडी, सौ.साक्षी सुनिल घाडी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहलींनी केली यादी जाहीर… मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आणि प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार सुनिल शेळके, आमदार विक्रम काळे, आमदार चेतन तुपे, आमदार नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री आमदार दत्तामामा भारणे, आमदार सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.

भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड मुंबई : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी येथे केले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) लॉजिस्टिक उद्योगाच्या पाचव्या ‘लॉजिक्स इंडिया – २०२४’ या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे उदघाटन हॉटेल वेस्ट-इन गोरेगाव मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सने (फियो) केले. भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनविण्याचे दृष्टीने भारत सरकारने २०२२ मध्ये आपले राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जाहीर केले आहे. लॉजिस्टिक उद्योगाचा विस्तार केवळ औद्योगिकीकरणाला चालना देत नाही, तर त्यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. राज्यात २७ सार्वजनिक विद्यापीठे असून लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्याची क्षमता विद्यापीठांकडे आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी लॉजिस्टिक क्षेत्रातील निर्यात महासंघासोबत काम करावे, अशी सूचना आपण विद्यापीठांना करू असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.उदघाटन सत्राला शिपिंग कॉर्पोरेशनचे महासंचालक श्याम जगन्नाथन, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष अश्वनी कुमार, शारजा येथील सैफ झोनचे वाणिज्य संचालक रईद बुखातिर, फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष परेश मेहता तसेच विविध देशांमधील लॉजिस्टिक उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड जिल्हा हा ३२-रायगड आणि ३३-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की,मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी. आवश्यकते नुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी. वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक अटींची खात्री करावी. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी. आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जावळे यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र बनवली जातील, ती स्थानिक साहित्याने सुसज्ज असावीत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील किमान ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाचा दिनांक लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा बरोबरच एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संगितले.

लडाखच्या न्याय लोकचळवळीला जनआंदोलनांचा पाठिंबा-जगदीश खैरालिया

अनिल ठाणेकर ठाणे : लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि त्यांच्या बरोबर लडाखचे हजारो नागरिक लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि लडाखच्या समृद्ध आणि अद्वितीय अशा पर्यावरणाचे जतन व्हावे यासाठी गेले २१ दिवस उपोषण करत होते; काल त्याचा शेवटचा दिवस होता. दिनांक २३ मार्च २०२४ रोजी शहिद भगतसिंगांच्या शहादत दिनी  व डॅा. राम मनोहर लोहिया जयंतीदिनी जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय महाराष्ट्रने लडाखच्या न्याय्य लोकचळवळीला पाठिंबा म्हणून दिवसभर उपवासाचे आवाहन केले होते. या आवाहनाला  प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून २२ जिल्ह्यांतील सुमारे २०० जणांनी तसेच दिल्ली, कॅनडा आणि लंडन येथूनही काहीजणांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असा दिवसभराचा उपवास केला. यात ठाण्यातील २५ जणांनी सहभाग घेतला , अशी माहिती समन्वयाचे ठाणे जिल्हा संयोजक जगदीश खैरालियांनी दिली. लडाख सारख्या प्रदेशात विकासाच्या नावाने पर्यावरणावर होत असलेले आघात आणि स्थानिकांच्या मतांना प्राथमिकता न देण्याचा परिणाम म्हणून तेथील नागरिक संविधानाच्या ६ व्या अनुसूची मार्फत होणार्‍या विकास नियोजनात सामील होण्याचा अधिकार मागत आहेत. यावर प्रश्न विचारणारे त्यांना ‘विकास विरोधी’ संबोधत आहेत, हे चुकीचे आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ ची घोषणा सुद्धा यामुळे खोटीच ठरली आहे. संविधानाच्या अनुच्छेद २४३, २४४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे पालन तसेच आदिवासींच्या (अनुसूचित जमाती) क्षेत्रात ‘पेसा’ कायद्याचे पालन न झाल्याने संपूर्ण देशात विकासाचे नियोजन लोकशाही पद्धतीने न होता ते भांडवलशाही, बाजार आणि राजकीय आधारावर होत आले आहे आणि त्यामुळे असमानता, विनाश आणि विस्थापनच्या रुपात सामान्य जनता विशेषतः आदिवासी आणि जनजाती समुदाय त्याचा त्रास भोगत आहे. याच परिप्रेक्षात लडाखच्या लोकांच्या मागण्यांना समर्थन देणे आवश्यक आहे, असं समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ म्हणाले. यात उल्लेखनीय बाब अशी की भाजप सरकाराने स्वतः आपल्या २०१९ च्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात लडाखला ६ व्या अनुसूचित सामील करण्याचे आश्वासन दिले होते पण आता ५ वर्षा नंतरही ते आश्वासन पाळले नाही. कॉर्पोरेट घराण्याच्या दबाव आणि प्रभावाखाली सर्वात जास्त काम करणारे हे सरकार मुळात तिकडच्या लोकांना आपल्या लोकशाही हक्कांपासून वंचित करुन लडाखला कंपन्यांच्या हवाली करण्याच्या विचारात आहे. या पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील क्षेत्रात जिथे जमिनीची लूट आणि निसर्गाशी खेळ करणे खूप महागात पडू शकतं तिथे संविधानाचे संरक्षण असणे महत्वाचे आणि गरजेचे आहे, असं मिक्ता श्रीवास्तव यांनी सांगितलं.  आज देशात संविधानिक मूल्ये, संघराज्य रचना, समता, न्याय, बंधुता, समाजवाद, निसर्गाचे रक्षण आणि लोकशाही प्रक्रियेने विकेंद्रित आणि निरंतर विकास यांची कास धरत प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजांची पूर्ति करणे गरजेचे आहे. याच व्यापक विचारधारेच्या उद्देशासह लडाखच्या जनतेचा संघर्ष महत्वाचा आहे. हा संघर्ष सर्व भारतवासियांना एक विशेष संदेश देतो आहे, असं समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम म्हणाल्म्ही, लडाखच्या जन आंदोलनाला संपूर्ण समर्थन देत असताना भारत सरकारकडे मागणी करतो आहोत की त्यांनी लडाखच्या जनतेची मागणी पूर्ण करावी. कडाक्याच्या थंडीत २१ दिवसाच्या उपोषणाला बसलेल्या व्यक्तीबरोबर १८ दिवस झाले तरी सरकार द्वारा काहीही संवाद नाही, हे या सरकारची असंवेदनशीलता दर्शवते. आम्ही या पत्रकाद्वारे इशारा देतो की, केंद्र सरकाराने लडाखच्या जनतेचा अपमान करू नये आणि सत्याच्या विरोधात असत्य आणि दमनाचा मार्ग घेऊ नये; नाहीतर संघर्ष तीव्र होईल हे नक्की! केंद्र सरकारने लडाखच्या संघटनांशी, समन्वयाशी लगेच संवाद सुरु करावा ही मागणी करत आहोत, असे प्रतिपादन समन्वयाच्या राज्य समन्वयक सिरत सातपुते यांनी केले. आम्ही लडाखच्या लोकांना सुद्धा अपील करू इच्छितो की, आपल्या क्षेत्रात नैसर्गिक संपदा आणि सांस्कृतिक विविधतेला वाचवण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठीं त्यांनी भाजप आणि RSS यांच्या राजकीय इच्छा आकांक्षाना समजून घेणे आणि निवडणूकीत आणि प्रत्यक्ष जमिनीवर त्यांना हरवणे अतिशय जरुरी आहे. आपल्या देशाच्या व्यापक लोकशाहीला आणि संविधानाला वाचवतच आपण लडाखला वाचवू शकू, असं आंदोलन मासिकाच्या संपादक मंडळ सदस्य मीनल उत्तुरकरांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन अजय भोसले यांनी तर प्रास्ताविक दर्शन पडवळ या एकलव्य कार्यकर्त्याने केले.

निजामकालीन नोंदी पाहून कुणबी समाजाला आरक्षण द्यावे – कुणबी सेनेची मागणी

रमेश औताडे मुंबई : निजामकालीन दप्तरात सन १८८४ व सन १९७७ च्या गॅझेट मध्ये कुणबी नोंदी आहेत. त्या अनुषंगाने कुणबी समाजाला कुणबीचे आरक्षण मराठवाड्‌यात देण्यात यावे अशी मागणी कुणबी सेनेने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी  केली. मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत संघर्ष करीत आहोत असे सांगत कुणबी सेनेचे नामदेव काडे म्हणाले, निजामकालीन  पुराव्याच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाने नऊ  सदस्य समिती गठित केली होती. मराठवाड्यातील निजामकालीन कुणबी नोंदीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील गरजवंत मराठा समाजाला व कुणबी मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. दरम्यान  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावरून शासनाकडे मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण द्यावे हिच मागणी लावून धरल्यामुळे या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. कारण देशमुख मराठा, पाटील मराठा, आणि कुणबी मराठा थोडक्यात मराठवाड्यातील प्रस्थापित व विस्थापित सर्व मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिल्याने हे आंदोलन मराठवाडा, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर  पोहोचू शकले. मात्र कालांतराने जरांगेपाटील यांनी मराठवाड्‌याचा विषय का सोडून दिला?  हे मात्र कळाले नाही. मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला मिळणारे कुणबीचे आरक्षण का नाकारले हे कळू शकले नाही? असे सवाल यावेळी कुणबी सेनेचे विष्णू कदम यांनी केले.  निजामकालीन कुणबी नोंदी व इतर कुणबी नोंदीचे पुरावे या सगळ्या बाबी तपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्‌यासाठी कुणबीचे आरक्षण देण्यासाठी पूर्ण तयारी केली असताना जरांगे पाटील यांनी हे आरक्षण नाकारले आहे. आणि त्यानंतर हळूहळू मराठवाड्याचा विषय त्यांनी सोडून दिला आहे .त्यांच्या मागण्या सुद्धा बदलत गेल्या. हा थोडासा संशोधनाचा विषय बनला आहे.  वाईदेशी कुणबी या जातसमूहाचा कुणबी मध्ये समावेश करून या जात समुहाला कुणबी चे आरक्षण द्यावी, अशी मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत आणि त्या मागणीला यश सुद्धा प्राप्त झाले होते मात्र मराठा आंदोलनामुळे हा विषय पाठीमागे राहून गेला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने ४ जून २०२३ ते ७ जून २०२३ या दरम्यान चार जिल्ह्याचा दौरा करून या समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षत्रिय पाहाणी केली आहे या दौऱ्यामध्ये चार जिल्ह्याचा समावेश होता. आयोगाच्या सदस्य समितीमध्ये मी स्वतः आयोगाच्या सोबत चारही जिल्ह्यांमध्ये फिरलो आहे. या दरम्यान आयोगाच्या सदस्य समितीला आमच्या मागणीची सत्यता पटल्याने त्यांनी परत १० सप्टेंबर २०२३ व १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोगाने दौरा करून सत्यता तपासली आहे असे कुणबी सेनेचे गणपत जाधव यांनी यावेळी सांगितले.

विहंग प्रतिष्ठान आयोजित काव्यरंगोत्सव

ठाणे : विहंग प्रतिष्ठान या नेहरुनगर कुर्ला येथील संस्थेच्या वतीने शनिवार, ३० मार्च रोजी काव्यरंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला पूर्व येथील नेहरुनगरमधील शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजता हा काव्यरंगोत्सव होणार असून आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या हास्यकविता स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या १० कवितांचे सादरीकरण काव्यरंगोत्सवात संबंधित कवीद्वारे करण्यात येईल. काव्यरंगोत्सवास लेखिका माधवी कुंटे, कवयित्री लता गुढे, कवयित्री चारुलता काळे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालिका सायली वेलणकर या पाहुण्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. अधिक माहितीसाठी राजीव भांडारे (८१०८४३४८६४), राजश्री कदम (७७३८०५११४७) यांच्याशी संपर्क साधावा.

आयुषने दाखवला अंतिम फेरीचा रूट

४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : चार विकेटसह नाबाद ६९ धावांची खेळी करत आयुष वर्तकने रूट मोबाईल संघाला ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील अ गटाच्या अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करून दिला. उपांत्य फेरीच्या सामन्यात रूट मोबाईल संघाने मुंबई पोलीसांच्या ब संघावर सहा विकेट्सनी विजय मिळवत निर्णायक फेरीत स्थान मिळवले. नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रूट मोबाईल संघासाठी फायदेशीर ठरला. आयुष वर्तकांची अचूक टप्प्यावरील गोलंदाजी आणि त्याला चांगली साथ देणाऱ्या हितेश परमार, दिनार गावकरच्या माऱ्यासमोर मुंबई पोलिसांनी १४७ धावांवर आपल्या बॅटी म्यान केल्या. संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देताना अनुज गिरीने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तन्मय गावकरने १४ धावा केल्या. बंगळुरु येथील १९ वर्षाखालील नॅशनल क्रिकेट अकॅडेमीतील प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या आयुषने ३७ धावांत चार बळी मिळवत मुंबई  पोलिसांना चांगलेच त्रासावले. हितेश आणि दिनारने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या छोट्या आव्हानाला सामोरे जाताना तीन फलंदाज अवघ्या १८ धावांवर माघारी आल्यामुळे रूट मोबाईलचे नेटवर्क डळमळीत झाले होते. पण अथर्व काळे आणि आयुषने चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला विजयाच्या दिशेने नेले.अथर्वने ४९ धावांची खेळी केली. मुंबई पोलीसांच्या अतुल मोरेने दोन, साईप्रसाद हिंदळेकर आणि  तन्मय मयेकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक : मुंबई पोलीस (ब) : ३३ षटकात सर्वबाद १४७ ( अनुज गिरी ५२, तन्मय मयेकर १४, आयुष वर्तक ७-३१-४, हितेश परमार ७-१-२४-२, दिनार गावकर २-१८-२, प्रभाकर निषाद ६-२५-१, अजय मिश्रा ७-२४-१) पराभूत विरुद्ध रूट मोबाईल : २०.२

मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात –  बाळासाहेब राक्षे

जिल्हा परिषद ठाणे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न ठाणे : विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद योजनेंतर्गत क्रीडा स्पर्धा केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर घेतल्या जातात. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ऑल सेट्स हायस्कूल भवाळे, ता. भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होत्या. शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले तसेच मशाल ज्योत पेटवली व पाच तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मानवंदना दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे. शैक्षणिक शिक्षणासोबतच मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात. आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी दररोज खेळावे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. केंद्र पातळीवर प्रथम आलेले संघ तालुका पातळीवर आणि तालुका पातळीवर प्रथम आलेले संघ जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक प्रकारात तसेच मुले व मुली या स्वतंत्र गटात घेण्यात आल्या असून सांघिक स्पर्धेत खो खो, कबड्डी, लंगडी, लेझीम या खेळाचा तर वैयक्तीक स्पर्धेत ५० मिटर व १०० मिटर धावणे,  २५X४ रिले, लांब उडी व संगीत खुर्ची या खेळाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी प्रदीप घोरपडे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण प्राथमिक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. विद्या शिर्के व रविंद्र तरे यांनी सुत्रसंचलन करून विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढविला.