अमेरिकेतील बाल्टिमोरच्या की ब्रिज परिसरात कंटेनर जहाजाची टक्कर झाल्यानंतर पूल पत्त्याच्या डेकसारखा कोसळला. पूल कोसळल्याचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक मोठे कंटेनर जहाज पुलाच्या खांबाला आदळताना दिसते. त्यानंतर पूल पटापस्को नदीत बुडाला; मात्र हा पूल कोसळल्याने पुढील अनेक महिने अमेरिकेसह जगातील देशांना फटका बसू शकतो. किंबहुना, यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
पनामा कालव्यातील दुष्काळ आणि लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जागतिक पुरवठा साखळी आधीच विस्कळीत झाली आहे. आता बाल्टिमोरमधील पूल कोसळल्याने त्याच्या समस्या वाढल्या आहेत. पुलाला तडे गेल्याने त्या मार्गावरून जाणारी सर्व जहाजे थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या शेकडो गाड्या अडकून पडण्याचा धोका आहे. तसेच २५ लाख टन कोळसा अडकला आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारताला होणार्‍या कोळश्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो.
‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, बाल्टिमोर दुर्घटनेमुळे न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया बंदरांवर दबाव वाढू शकतो. बाल्टिमोर हे अमेरिकेतील पूर्व किनार्‍यावरील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे. कार आणि हलके ट्रक बनवणार्‍या युरोपीयन कंपन्यांसाठीही हे एक अतिशय महत्त्वाचे बंदर आहे. या बंदराभोवती मर्सिडीज, फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यूची युनिट्स आहेत. याशिवाय अमेरिकेतून कोळसा निर्यातीसाठी बाल्टिमोर हे दुसरे मोठे टर्मिनल आहे. विशेषतः भारतातील कोळशाच्या निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो. भारताच्या एकूण कोळसा आयातीत अमेरिकेचा वाटा सहा टक्के आहे. कोळशाची सर्व निर्यात बाल्टिमोर बंदरातून होते. भारतातील कोळशाचा वार्षिक वापर एक हजार दशलक्ष टन आहे. त्यापैकी २४० दशलक्ष टन आयात केला जातो. त्यानुसार बाल्टिमोर दुर्घटनेमुळे भारताचे करोडोंचे नुकसान होऊ शकते.
या दुर्घटनेनंतर जवळपास डझनभर जहाजे बाल्टिमोर बंदरात अडकली. यामध्ये मालवाहू जहाज, ऑटोमोबाईल कॅरिअर आणि टँकरचाही समावेश होता. याशिवाय अनेक टगबोटीही तेथे अडकून पडल्या. दररोज ३५ हजार लोक या पुलाचा वापर करतात. सुमारे २८ अब्ज डॉलर किमतीचा माल दर वर्षी त्यातून जातो. हा पूल बांधण्यासाठी पाच वर्षे लागली आणि तो १९७७ मध्ये पूर्ण झाला. त्याची किंमत सुमारे १४१ दशलक्ष डॉलर्स होती. बाल्टिमोर बंदरातील कामकाज पूर्ववत होण्यासाठी काही महिने लागू शकतात. यासाठी ६०० दशलक्ष डॉलर्स खर्च होऊ शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *