५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
दिल्ली (क्रि. प्र.), दिल्ली येथील करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे संपन्न झालेल्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने डबल धमाका करताना पुरुषांनी रेल्वेला तर महिलांनी भारतीय विमान प्राधिकरणाला पराभवाची धूळ चारत जल्लोषात विजय साजरा केला. या विजयासह पुरुषांमध्ये महाराष्ट्राने ३९ वे तर महिलांमध्ये महाराष्ट्राने २५ वे अजिंक्यपद मिळवत एक नवीन विक्रम केला. गेल्या काही वर्षात रेल्वेने दिलेले कडवे आव्हन या वर्षी महाराष्ट्राने मोडून काढत विजयश्री अक्षरश: खेचून आणली. या वर्षी महाराष्ट्राने तिन्ही गटात विजेतेपद मिळवताना एकूण सहा अजिंक्यपद मिळवली आहेत. (सब जूनियर गटाचे दोन व जूनियर गटाचे दोन व खुल्या गटाचे दोन अशी एकूण सह अजिंक्यपद मिळाली आहेत).
महिला गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने भारतीय विमान प्राधिकरणावर ३.२० मि. राखून आरामात दोन गुणांनी पराभव केला. मध्यंतराला महाराष्ट्रकडे १०-८ अशी दोन गुणांची आघाडी होती. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (२.२०, २.२० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (१.१०, १.४० मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (२.१०, १.१० मि. संरक्षण व ४ गुण), काजल भोर (६ गुण), कोमल धारवटकर (नाबाद १.५०, नाबाद १.४० मि. संरक्षण) यांनी विजयात धमाकेदार व सुवर्णमयी खेळ केला. भारतीय विमान प्राधिकरणातर्फे प्रियांका भोपी (२.१०, १.१० मि. संरक्षण व ४ गुण), तेजस्विनी के. आर. (१.४०, २ मि. संरक्षण), प्रिती काळे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी महाराष्ट्र संघाला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र अनुभवी खेळाडूंच्या जोरावर महाराष्ट्राने सहज विजय मिळवत दुहेरी विजयाची पायाभरणी केली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या खेळात महाराष्ट्राने पारंपरिक प्रतिस्पर्धी रेल्वेचा एक गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रला जादा डावात विजयासाठी १० गुणांची गरज होती. आक्रमणाला सुरवात केल्यावर काही सेकंदातच रेल्वेचा अनुभवी खेळाडू महेश शिंदे याला महाराष्ट्रच्या गरगटेने बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वेचे गडी बाद होत गेले. डाव संपण्यासाठी एक मिनिट शिल्लक असतानाच महाराष्ट्रला जिंकण्यासाठी एक गुणाची गरज होती. शेवटचे दोन सेकंद असताना गडी बाद करत महाराष्ट्रने रेल्वेवर जोरदार मात केली.