मागील वर्षीपेक्षा 83.66 कोटी रक्कमेची अधिक वसूली
नवी मुंबई : मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या आर्थिक वर्षात सन 2023-2024 मध्ये रु. 716.97 कोटी रक्कमेचे उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झाले असून ते मागील 2022 -2023 वर्षापेक्षा 83.66 कोटींनी अधिक आहे. मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा हा आत्तापर्यंतचा विक्रम आहे.
मागील वर्षी महानगरपालिकेकडे मालमत्ता करापोटी 633.31 कोटी इतकी रक्कम जमा झाली होती. यावर्षी वसूलीचे सुयोग्य नियोजन करीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मालमत्ता कर थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांच्या थकबाकी रक्कमेनुसार उतरत्या क्रमाने यादया तयार करण्यात येऊन अधिकाधिक महसूल वसूलीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पाठपुरावा करण्यात आला.
याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व थकीत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा व्हावा यादृष्टीने 1 ते 31 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली. यामध्ये 1 ते 20 मार्च या कालावधीत थकबाकीच्या दंडात्मक रककमेवर 75% सवलत तसेच 21 ते 31 मार्च या कालावधीत 50% सवलत लागू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला व 8740 थकबाकीदारांनी 116 कोटी इतकी रक्कम अभय योजनेअंतर्गत थकबाकीच्या दंडात्मक रक्कमेवरील सुटीचा लाभ घेत भरणा केली. या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना रु. 45.56 कोटी इतकी रक्कम सवलत देण्यात आली. याचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत 83.66 कोटी रक्कमेने अधिकची मालमत्ता करवसूली झाली.
नागरिकांना मालमत्ता कर भरणा करणे सुलभ व्हावे यादृष्टीने आवश्यक काळजी घेत या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन दिवस सार्वजनिक सुट्टी आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता महानगरपालिकेची सर्व कार्यालये व नागरी सुविधा केंद्रे करभरणा करण्यासाठी सुरु ठेवण्यात आली. त्यामुळे सुट्टीच्या तीन दिवसात 29 मार्चला 28.78 कोटी, 30 मार्चला 8.38 कोटी व 31 मार्चला 4.10 कोटी अशाप्रकारे अखेरच्या 3 दिवसात एकूण 41.26 कोटी इतकी रक्कम जमा झाली. त्याचप्रमाणे मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात 163.50 कोटी इतक्या रक्कमेचा करभरणा नागरिकांनी केला.
नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेला नेहमीच गती मिळालेली असून मालमत्ता करापोटी जमा होणारी रक्कम ही दर्जेदार नागरी सेवासुविधा पूर्तीसाठी वापरली जात असल्याने नवी मुंबईकर नागरिकांनी शहराच्या प्रगतीत आपले योगदान दिलेले आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराची रक्कम विहित कालावधीत भरणा केल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.