अनिल ठाणेकर
ठाणे : शिवाईनगर परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या स्थानिक माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या समाज मंदिर कामांविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज बाण सोडलेला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महापालिका स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर प्रभाग क्रमांक ५ मधील गणेश नगर येथील म्हाडाच्या लेआऊट मधील मोकळ्या जागेवर शिवसेना (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या समाज मंदिर हाॅलचा वापर गत चार वर्षांपासून सुरु असून सदर मिळकत ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थावर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरीत केल्याबद्दलची सर्व कागदपत्रे स्थानिक रहिवाशांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत. ठाणे महापालिका सचिव यांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४७ येथील खेळाच्या मैदानावर बांधण्यात आलेल्या समाज मंदिर हाॅलच्या नामांकरण ठरावाची प्रत मिळावी तसेच वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर परिसरातील सेप्टीक टाकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या समाज मंदिराच्या कामाची माहिती देण्यात यावी, अशा मागणीचे लेखी अर्ज महापालिका प्रशासनाकडे करुन शिवसेना (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अर्ज बाण सोडला आहे.