अनिल ठाणेकर
ठाणे : लोकसभा निवडणुकीतील प्रबोधनासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदार जाणीव जागृती कृती आराखडा आखण्यात आला असून १ एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याची माहिती ठाणे झजिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचा मतदार जाणीव जागृती कृती आराखडा १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर या तालुक्यांमधील कौटुंबिक हिंसाचारांतर्गत नोंदणीकृत असलेल्या १५००. महिलांना व बालसंगोपन, शिलाई मशीन, स्वयंरोजगार, विद्यावेतन या ३६०० लाभार्थीं महिलांना आणि महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित ४५०० बचतगटातील महिला प्रमुखांना, मतदान ओळखपत्र नसल्यास उपलब्ध करुन देणे, मतदान करणेविषयी जाणीव जागृती करणे, १८ वर्षापेक्षा अधिक असलेल्या मुलींना नमुना ६ भरणे याबाबत सूचित करणे. १० एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत वरील १२, ००० महिलांना फोन, एसएमएसद्वारे मतदान विषयी जाणीव जागृती करणे व माहिती पुरविणे. २० एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत ४२०० अंगणवाडी सेविका, ४२०० मदतनीस, १०० मुख्यसेविका यांच्याद्वारे पथनाट्य, प्रभातफेरी, प्रदर्शन, स्पर्धा या माध्यमातून मतदान विषयी जाणीव जागृती करणे व माहिती पुरविणे. जाणीव जागृतीसाठी फेसबुक, युट्यूब, मेसेज, काॅल, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हिडीओ काॅल, बॅनर, मोखिक आदी संपर्क साधनांचा उपयोग करणे. तसेच भारतीय घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याचा आणि देशासाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवार निवडण्यासाठी निर्भयपणे, निष्पक्षपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करेन अशा अर्थाचा संकल्प या जाणीव जागृती उपक्रमांतर्गत करण्यात येणार असल्याचेही ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.