वसई : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फार पूर्वीपासून नाणी चलनात आहेत. प्राचीन साम्राज्य, राजवटींसह स्वातंत्र्यपूर्व काळातील नाणी वसईकरांना पाहता यावी, यासाठी वसई न्यायालयाच्या आवारात असलेल्या बार असोसिएशन रूम येथे नाणी प्रदर्शनाचे आयोजन (ता. २) करण्यात आले होते. या वेळी प्राचीन नाणी व त्याचा इतिहास समजण्यासाठी न्यायाधीश, वकिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली.

शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बार असोसिएशनचे अॅड. भरत पाटील, अॅड. आनंद घरत, अॅड. पूनम जाधव यांनी नाणी संग्रह प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मुंबई कॉईन्स सोसायटी न्यूमिसमॅटिक सभासद जोसेफ लोपीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, व्यंकोजी राजे भोसले, पेशवेकालीन व पोर्तुगीज, तसेच बसिन (वसई) अशी दुर्मिळ नाणी जमा केली आहेत. जोसेफ लोपीस यांच्या मदतीने नाणी प्रदर्शन भरविण्यात आले. सुमारे एक हजार नाणी प्रदर्शनात होती. तोफगोळेदेखील नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली. या वेळी न्यायाधीश आर. डी. देशपांडे, न्यायाधीश खोंगल, नाथानी, वाळके आदींनी भेट दिली, तर ज्येष्ठ वकील अविनाश विद्वांस, नंदन भगत बार असोसिएशनचे अध्यक्ष परमानंद ओझा, दिगंबर देसाई, साधना धुरी यांच्यासह मोठ्या संख्येने वकील मंडळी सहभागी झाली होती.

जग तंत्रज्ञानात पुढे जात आहे. नव नवी संशोधने होत आहेत, अशावेळी प्राचीन इतिहासालादेखील तितकेच महत्त्व आहे. नाणी प्रदर्शन म्हणजे जगात पूर्वी घडलेल्या घडामोडी आणि तेव्हाच्या राजे- महाराजे, नागरिकांनी वेळोवेळी केलेले बदल दिसून येतात, असे मत अॅड. नंदन भगत यांनी व्यक्त केले.

बसिनचा एक पैसा

सध्या शहराचे नाव वसई असले तरी प्राचीन काळी बसिन म्हणून प्रचलित होते. त्यावेळी बसिनचे नाणेदेखील चलनात होते. नाणी प्रदर्शनात बसिन एक पैसा हे नाणेदेखील समाविष्ट असल्याने वसईकरांनी अभिमानाने व कुतूहलाने ते पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *