शेतकरी कीर्तन महोत्सव!
शेतक-यांच्या व्यथा -वेदनांवर संत विचारांची हळूवार फुंकर घालून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना त्याविरोधात लढण्याचे बळ निर्माण करण्याचा प्रयत्न सहजपणे केला जात आहे. या कीर्तन महोत्सवातून शेतक-यांची मानसिक, सामाजिक आणि शारीरिक दुर्बळता दूर करतानाच त्यांच्या जीवनात आनंद पेरला जात आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षांपासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी 14 गावांनी मिळून हा महोत्सव केला होता. या वर्षी त्यात आणखी सात गावांचा समावेश वाढला. किसान सभेचे अॅड. अजय बु-हांडे यांच्या संकल्पनेतून हा कीर्तन महोत्सव सुरू करण्यात आला असून त्याच्या कल्पकतेचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतूक होत आहे. कमीत कमी खर्चात सर्वांगीन उच्च प्रबोधन या कीर्तन महोत्सवातून होत आहे.
सध्या कीर्तन महोत्सव आणि हरिनाम सप्ताहाला एक भपकेबाज स्वरूप आले आहे. त्याला फाटा देऊन कमीत कमी खर्चात सामाजिक भान देणारा कीर्तन महोत्सव कसा असू शकतो याचा वस्तू पाठ या कीर्तन महोत्सवाने घालून दिला आहे. रोज एका गावातून आलेल्या भाकरी आणि कीर्तन स्थळी केलेली एखादी भाजी किंवा पिटलं हा इथला पंगतीचा मेनू. उच्च शिक्षित , अभ्यासू कीर्तनकारांची निवड करतानाच त्यांना प्रवास भाड्या इतकेच मानधन दिले जाते. या वर्षी या कीर्तन महोत्सवात शेतक-यांच्या मानसिक, अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक व्याधीही दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वर्षी या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन अध्यात्मिक क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या उपस्थितीत झाले. त्यातील एक होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज आणि दुसरे होते पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महराज जाधव! या कीर्तन महोत्सवाची वैचारिक बैठक या दोघांनी पहिल्याच दिवशी भक्कम केली. सध्या कोणत्याही अध्यात्मिक कार्यक्रमातून एक धार्मिक उन्माद पाहायला मिळतो. धर्म युद्धाच्या गर्जना ऐकू येत आहेत, त्यावर भाष्य करताना राजाभाऊ महाराज चोपदार यांनी धर्म-अधर्माची अचूक व्याख्या केली. नितीने वागणे, सत्याने वागणे हा धर्म आहे, तर अनितीने वागणे हा अधर्म आहे, असे ते म्हणाले. भारत महराज जाधव यांनी संतांच्या नुसत्या आरत्या गावू नका तर त्यांचे विचार आचारणात आणा, असे आवाहन केले. महिलांनी काल्पनिक पोथ्या वाचण्यापेक्षा सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माँ साहेब यांचे चरित्र वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला. तर रात्री झालेल्या पहिल्या कीर्तनात डाॅ. बालाजी जाधव महाराज यांनी संतांनी घालून दिलेल्या समतेच्या मार्गावरून चालावे, असे आवाहन केले.
देवाचा नाही तर शेतक-यांचा कीर्तन महोत्सव
देवाच्या नावाने चालणारे अनेक कीर्तन महोत्सव पाहिले, परंतु शेतक-यांच्या नावाने सुरू असलेला हा एकमेव कीर्तन महोत्सव आहे, असा सूर शेतकरी कीर्तन महोत्सवात आलेल्या सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ख-या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ही सुरूवात म्हणता येईल, असे मतही अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. इतर कीर्तन महोत्सवात केंद्रस्थानी देव असतो. इथे जगाला जगवणारा शेतकरी केंद्र स्थानी आहे. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलून जग जगविणारा शेतकरी सर्व बाजूंनी गांजला जात असतांना त्याला जगण्याचे बळ देणारा विचार प्रत्येक कीर्तनकारांनी मांडला. शेतकरी भाविक, भाबडा असतो विशेषतः महिला अधिक श्रद्धाळू असतात, त्यांच्या या श्रध्दाळूपणाचा फायदा काही भोंदू लोक घेतात. या भोळ्या-भाबड्या माय भगिनींना कर्मकांडात अडकविले जाते. या कीर्तन महोत्सवातून अंधश्रद्धावर प्रहार करून समाजाला विवेकी बनविण्याचा प्रयत्न केला गेला. डाॅ. बालाजी महाराज जाधव, विजय महाराज गवळी, एकनाथ महाराज माने, तुळसीराम महाराज लबडे, गणेश महाराज फरताळे, मधुकर महाराज बारुळकर यांची कीर्तने झाली. माझे (शामसुंदर महराज सोन्नर) काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनाची परंपरा सुरू करून संतांनी सामाजिक समतेचा कसा वस्तू पाठ घालून दिला याची मांडणी करण्यात आली.
कीर्तनकार-प्रवचनकार यांची निवड करताना वेगवेगळ्या आध्यात्मिक संप्रदायाचा समावेश करण्यात आला होता. ही अवघड जबाबदारी अॅड. अजय बु-हांडे यांनी माझ्यावर सोपविली होती. या वर्षी तुकडोजी महाराज प्रणित गुरूदेव संप्रदायाचे ज्ञानेश्वर दादा रक्षक आणि रवी मानव यांची ग्राम गीतेवर प्रवचने झाली. त्यांच्या सोबत आलेल्या तुकडोजी महाराज संस्थान गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सुंदर भजने सादर केली. आनंद महाराज काकडे, रामेश्वर महाराज त्रिमुखे, मुबारक भाई शेख, भारत महाराज घोगरे गुरुजी यांची प्रवचने झाली.
आरोग्य विषयक जाणीव जागृती
बारा महिने मातीत राबत असताना शेतक-यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. किरकोळ आजार अंगावर काढले जातात. त्यातूनच कॅन्सर, ह्रदररोगासारखे आजार गंभीर अवस्थेला पोहचल्यास त्यावर उपचार करणे अवघड जाते. म्हणूनच या कीर्तन महोत्सवात शेतक-यांच्या आजाराची वेळीच माहिती व्हावी, शेतक-यांनी कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच त्यावर उपचार घ्यावेत यासाठी तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ. हमीद दाभोळकर यांनी मानसिक आजारावर मार्गदर्शन केले, तर डाॅ. हरिदास गडदे यांनी कर्क रोगाची लक्षणे कशी ओळखावीत यावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्र रोग तज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाणे यांनी डोळ्यांची काळजी घेण्याबरोबरच अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा सल्ला शेतकरी महिलांना दिला. यावेळी सुमारे 450 शेतक-यांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. त्यातील 70 पेक्षा जास्त मोती बिंदूचे रुग्ण आढळले. डाॅ. बिराजदार यांनी ह्रदय रोगाबाबत मार्गदर्शन केले. शहीद भगतसिंग यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थी युवकांच्या संघटना व कान्नापूर गावातील तरुणाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. शेतक-यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एकमेव कीर्तन महोत्सव असल्याची भावना सर्वच डॉक्टरांनी व्यक्त केली.
प्रवचन-नमाज, हरिपाठ – इफ्तारी
शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या अनेक उद्देशात सामाजिक सलोखा हा एक प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच या उपक्रमात सर्व जाती-धर्माचे वक्ते आणि श्रोते सहभागी होतात. या वर्षी पसायदान ट्रस्टचे विश्वस्त मुबारक भाई शेख यांचे पसायदानावर प्रवचन आयोजित केले होते. या प्रवचनासाठी त्यांच्या सोबत मौलाना अकबर मिल्ले, मुस्लिम संत विभागाचे अभ्यासक राजूभाई इनामदार हेही हा आगळावेगळा कीर्तन महोत्सव पाहण्यासाठी आले होते. हा रमजानचा पवित्र महिना आहे. मुबारक भाई शेख यांचे प्रवचन सुरू झाले आणि काही वेळातच संध्याकाळच्या नमाजाची वेळ झाली. शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या संयोजकांनी जवळच्या एका घरी नमाजाची व्यवस्था केली.
एकीकडे मुबारक भाई शेख यांचे प्रवचन सुरू होते त्याच वेळी दुसरीकडे मौलाना अकबर मिल्ले साहब आणि राजूभाई इनामदार यांचा नमाज सुरु होता.
नमाज संपल्यानंतर पुन्हा मौलाना आणि राजूभाई प्रवचनाला येऊन बसले. प्रवचनानंतर सर्वांनी एकत्रित माऊलींचे पसायदान गायले. प्रवचनानंतर हरिपाठ सुरू झाला. तेवढ्यात रोजा सोडण्याची वेळ झाली. एकीकडे हरिपाठ सुरू होता आणि दुसरीकडे इफ्तारी सुरू होती. असा सामाजिक सलोखा राहिला तर देशात कधीच धार्मिक विद्वेष वाढणार नाही, अशा भावना यावेळी मौलाना अकबर मिल्ले साहब यांनी व्यक्त केल्या.
कीर्तनकारांनी मानधन परत केले
हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन महोत्सवात कीर्तनकारांचे मानधन ठरविणे ही आता सामान्य बाब झाली आहे. हे मानधन ठरविताना एखादा सौदा सुरू असावा तशी घासाघीसही आता लोकांनी स्वीकारली आहे. शेतकरी कीर्तन महोत्सवातील अनुभव मात्र सुखद धक्का देणारा ठरला. या कीर्तन महोत्सवातून राबविले जाणारे उपक्रम, त्यामागील सामाजिक भान यांनी प्रभावीत होऊन या कीर्तन महोत्सवातील अनेक कीर्तनकार-प्रवचनकार यांनी मानधन परत केले. ज्यात राजाभाऊ महाराज चोपदार, भारत महराज जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, एकनाथ महाराज माने यांचा समावेश आहे. गणेश महाराज फरताळे यांनी मानधनातील काही भाग देगणी म्हणून या उपक्रमाला दिला. तर भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी संपूर्ण मानधन तर नाकारलेच वर स्वतःची काही देणगी या कीर्तन महोत्सवाला दिली.
एकंदर सामाजिक सलोखा, अंधश्रद्धा निर्मुलन, आरोग्य विषयक जाणीव जागृती अशा अनेक सामाजिक सुधारणांची सुरुवात शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. भविष्यात . असे कीर्तन महोत्सव एक चळवळ निर्माण करतील, असा आशावादही बु-हांडे यांनी व्यक्त केला۔.