मुंबई : हवामान बदलामुळे जगभरात तापमानाची वाढ नोंदविली जात असतानाच आता महाराष्ट्रातही येत्या तीन महिन्यातील तब्बल २० दिवस उन्हाचा जबरदस्त तडाका बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सुर्यदेव कोपणार असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मार्च महिन्यातच राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये तापमान अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तापमान अधिक राहणार असून तीन महिन्यांतील 20 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींना उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत नवले यांनी केले आहे.
उष्माघात होण्याची कारणे
शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.
उष्माघाताची लक्षणे
मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था आदी.