अकोला इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

अकोल्यातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले असता आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी आदींसह महायुतीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, अडीच वर्षांपासून विकासाची धुरा अनुप धोत्रे यांनी हातामध्ये घेतली. त्यामुळे एकमताने अनुप धोत्रेंना मैदानात उतरवले. ही देशाची निवडणूक आहे. अनुप धोत्रे यांचे कमळाचे बटन दाबल्यानंतर ते मत नरेंद्र मोदींना भेटते. पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदींना परत बसवण्यासाठी ही निवडणूक आहे.

आपण सकारात्मकतेने पुढे जात आहोत. पुढे बाळासाहेब येतील, काँग्रेसचा देखील उमेदवार राहील. आपल्याला काही करण्याची गरज नाही. इतिहास तपासून बघा, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिले नाही. अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदीजींच्या विकासासाठी व समर्थ भारत तयार करण्यासाठी सकारात्मकतेने मत मागायचे आहे. १० वर्षांत नरेंद्र मोदींनी २५ कोटी जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. प्रत्येक घटकाचा विचार करून त्याच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचं कार्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अर्थव्यवस्थेचा विस्तार केला. देशातील वंचितांचा विचार काँग्रेसने किंवा वंचित आघाडी नव्हे तर केवळ नरेंद्र मोदींनी केला आहे. संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्या जातात. मात्र, चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. संविधानाची हत्या तर १९७५ साली काँग्रेसने केली होती. या नाटकबाजांची नाटकं आता चालणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देशाला जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता नरेंद्र मोदींना पुढील पाच वर्षात बनवायची आहे. देशात अनेक संधी तयार होणार आहेत. ही निवडणूक जनतेची आहे. देशाच्या विकासाला मत म्हणजे मोदींना मत आहे. अनुप धोत्रे यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व नेते असून ते आपल्या वडिलांचादेखील विक्रम मोडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *