जळगावचे खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या सेनेत दाखल

जळगाव : भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंगची सवय झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घटना घडलीय. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आणि भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या सेनेत दाखल झाले. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाने उन्मेष पाटील तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. यादरम्यान मंगळवारी त्यांनी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले.

यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज नाही. तर माझ्या कामाची किंमत करण्यात आली नाही. मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकीटासाठी नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. ही लढाई पदाची जय-विजयाची नाही, ही लढाई आत्मसन्मानाची आहे. विकासाची लढाई आहे. तिथे आत्मसन्मान, संवाद होत नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. आज मी जात्यात आहे, तर अनेकजण सुप्यामध्ये आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात सुप्यातील अनेकजण पुढे येतील, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्याच आहेत. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *