सावंतवाडी : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मी झटत आहे.उध्दव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने कोकण भकास केले आहे. जनता त्याचा येणाऱ्या निवडणूकीत हिशेब करेल असा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहार करत करोनाच्या काळात औषधांत भ्रष्टाचार करणाऱ्या बाप लेक आत जाणार असा इशारा राणे यांनी केला. यंदाच्या निवडणूकीत रत्नागिरी- सिंधुदुर्गचा खासदार हा भाजपाचाच असणार असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
कुडाळ येथील भाजपा बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,निलेश राणे,प्रमोद जठार, अँड अजित गोगटे, राजन तेली, अतुल काळसेकर, रणजीत देसाई, आदी उपस्थित होते.
राणे यांनी उध्दव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्या वर सडकून टीका केली.ते म्हणाले ,रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार भाजपचा हवा. आजचा खासदार शेतीतील बुजगावणं आहे. शिवसेनेचा उल्लेख चिवसेना करत बाप बेट्याने करोना काळात औषधांत भ्रष्टाचार केला ते १५ दिवसात आत जाणार असे सांगून राणे यांनी त्यांनी अडीज वर्षात कोकणासाठी काय दिले.
लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे असे राणे यांनी सांगितले ते म्हणाले,आपण शांततेत निवडणूक लढवूया. कोणीही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सहनशीलतेला मर्यादा आहेत. जरूर तर साम दाम दंड भेद न करता भूमिका घेतली जाईल.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे,प्रमोद जठार, निलेश राणे, प्रभाकर सावंत व मान्यवरांनी विचार मांडले.
