अशोक गायकवाड

रायगड : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ करिता बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांनी मंगळवार, (दि.२) रोजी येथे केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत १२ वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षामाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर होण्याच्या उद्देशाने कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे आयोजित एक दिवसीय स्कूल कनेक्ट कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यशाळेस परिसरातील एकूण २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात राज्यात राबविण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील शैक्षणिक बदलांबाबत जागृती, बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजना, विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठात उपलब्ध शैक्षणिक सोई-सुविधा, विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठातील विविध विभागांना भेट आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, डॉ.एच.एस. जोशी, डॉ.ए.पी. शेष, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.एस.एम.पोरे आणि पदविका विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, भारतीय ज्ञान परंपरा, अकँडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलायीन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्कृती विकसित होण्याकरिता विद्यार्थी व शिक्षकांकरिता विद्यापीठामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आदान-प्रदान होण्यासाठी विद्यापीठ प्रशासन निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली. तसेच भारताला विश्वगुरु बनविण्याकरिता विकसित भारत २०४७ व आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले.

या कार्यशाळेत डॉ.ए.पी.शेष इंग्लिश विभाग प्रमुख यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना समग्र शिक्षण, जीवनावश्यक कौशल्य व माणुसकी याचे आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्व विषद केले. करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. नीरज अग्रवाल यांनी विद्यापीठात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप, स्टार्टअप / उद्योजकता करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ.बाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्वाची भूमिका पार पेल असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.मधुकर दाभाडे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना आपल्या भागातील संभाव्य उद्योग संधी लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी उद्योग स्थापन करावे तसेच आपल्या परिसरात उत्तम दर्जाचे अभियंता निर्माण होतील या करिता विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांनी विद्यापीठामार्फत उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यशाळेची प्रस्तावना डॉ.एच.एस. जोशी यांनी केली तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.रतिका जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संप्रीत गौड यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.संजय नलबलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नवीन खंडारे व विद्यापीठाचे अधिकारी/कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *