सातारा : सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असतानाच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या रिंगणात कोणत्याही परिस्थितीत उतरण्याची घोषणा केली आहे. उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी निश्चित असली, तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर आज सुद्धा भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला असून लोकांशी संवाद साधत आहेत.
आज उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ऐतिहासिक शाही मस्जिद येथे सर्व मुस्लिम बांधवांना भेटून पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांची राजे यांनी भेट घेतली. यावेळी मुस्लिम बांधवांकडून उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. उदयनराजे यांनी यांनी मुस्लिम समाजाशी संवाद साधला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी त्यांचा महाबळेश्वर आणि पाचगणीत संवा दौरा केला. यावेळी विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. उमेदवारीवर बोलताना म्हणाले की, आजपर्यंत कधीही राजकारण केलं नसून संपूर्ण समाजकारण. लोकहिताची कामे केली आहेत. कोणाला दुखवलं नाही, लोकांचे प्रेम असल्याने लोक ठरवतील काय करायचे ते. इथं आत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. बाकी मला काही माहिती नाही.
साताऱ्यातील संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारांवर बोलताना ते म्हणाले की, वैचारिक मतभेद असू शकतात. कदाचित माझे चुकीचे असेल त्यांचे बरोबर असेल, पण, त्यांचे विचार त्यांच्याजवळ माझे माझ्याजवळ. चर्चेतून मार्ग काढू शकतो. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे सर्व मित्रमंडळी आहेत. श्रीनिवास पाटील साहेब तर आमच्या वडिलांचे खास होते. त्यांनी मला एकदा दिल्लीत सांगितले की, तुमच्या बारशाला मी होतो तेव्हा तुम्ही पाळण्यात होता. त्यांचा आशीर्वाद निश्चित अपेक्षित आहे. ज्यांना उभे राहायचे आहे, त्यांना राहू देत.