महाविकास आघाडीचा आज कार्यकर्ता मेळावा
विरार : ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ‘महामेळावा आज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नालासोपारा (पश्चिम) येथील तानिया बँक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या या महामेळाव्याला शिवव्याख्याते तथा शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील संबोधित करणार आहेत, अशी माहिती शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘संघर्षकन्या` भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी भारती कामडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे.
दरम्यान; भारती कामडी यांचा पालघर लोकसभा ‘गावभेट दौरा सुद्धा आज सकाळी ९ वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाकरता प्रथमच आश्वासक महिला उमेदवार घोषित केला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेने या मतदार संघात आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा होणारा हा ‘महामेळावा` सामान्य नागरिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकरता प्रेरणादायी व ऊर्जा देणारा असेल. तसेच परिवर्तनाची नांदी देणारा ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
