कल्याण : विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३६० कोटी रुपयांची रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाची कामे प्रगती पथावर आहेत. यात एमएमआरडीए मार्फत २४ रस्त्यांची व महापालिकेमार्फत ७ रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. याच बरोबर रिंगरोडचे पुढील सेगमेंट ३ चे काम हाती घेण्यात येत आहे. सदर कामात भेडसावणा-या विविध अडचणीचा आढावा घेऊन पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी नुकतीच सर्व सबंधितांची आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत या कामातील बाधित बांधकामांच्या निष्कासनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित उप आयुक्त व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना तसेच भूसंपादन, जागेच्या अडचणीसंदर्भात नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सावंत यांना देण्यात आले. डोंबिवली येथे महानगर गॅस मार्फत करण्यात येणा-या खोदाईबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित सर्व कामे पुढील आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी महानगर गॅसच्या प्रतिनिधीना दिले. तसेच या कामात असलेले विद्युत टान्सफॉर्मर,जल/मलवाहिन्या यांच्या अडचणी संदर्भात एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढण्याच्या व सदर काम कालबध्द पध्दतीने करण्याबाबत सूचना संबधित अभियंत्याना देवून पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
सदर बैठकीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता कोरगावकर, अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, कार्यकारी अभियंता देवरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा. संचालक नगररचना दिशा सावंत, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, परिमंडळ उप आयुक्त प्रसाद बोरकर व रमेश मिसाळ, संबधित प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी व इतर अधिकारी उपस्थित होते.
