किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मुंबई- मातोश्री आणि तत्कालीन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे भ्रष्ट्राचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्लीतून आले होते. स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच मला हे आदेश अमंलात आणण्याबाबत सांगतिले होते, अशा शब्दात आज किरीट सोमय्यांनी खळबळजनक दावा केला. मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांची सुपारी फडणवीसांनीच दिली होती अशी कबुलीच त्यांनी आज दिली. मुंबईतक या वेबपोर्टलवरील चावडी या कार्यक्रमात किरीट सोमय्या सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते, त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. आम्ही आरोप करून विरोधी पक्षातल्या लोकांना जर जेलमध्ये टाकले नसते तर याच ठाकरे सरकारने आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडलं असतं असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. अनेक घोटाळे त्यांनी विधीमंडळात बाहेर काढले होते. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते. तर किरीट सोमय्यांनी विधानसभेच्या बाहेरची खिंड लढवली होती. प्रसंगी हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीत सदा कदम यांचे हॉटेल तोडायला निघाले होते हे ही महाराष्ट्राने पाहिलं आहे. या सगळ्या भ्रष्ट्राचाराच्या आरोप असणाऱ्यांना ्पक्षात घेताना आम्ही तडजोड केली याचे वाईट वाटते. पण ठाकरेंचे माफीया सरकार पाडण्यासाठी ते करणे गरजेचे होते असे समर्थनही किरीट सोमय्यांनी केले.
“ठाकरे सरकारमधल्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणं ही त्यावेळची गरज होती. तसं केलं नसतं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजपा संपवली असती, आम्हा विरोधकांना संपवलं असतं, तुरुंगात टाकलं असतं.” असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. “आम्ही कोणत्याही नेत्यामागची केस मागे घेतलेली नाही. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. भ्रष्टाचार सुरु झाला तर किरीट सोमय्या पुन्हा आवाज उठवणार” असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई महापालिकेत तुमची शिवसेनेसोबत २० वर्षे युती होती. युती असताना तुम्ही हा भ्रष्ट्राचार का बाहेर काढला नाही. हे म्हणजे वाल्याचा वाल्मिक होण्याआधीची स्थिती झाली. कुटुंबाने वाल्याच्या पापात सहभागी होण्यास नकार दिला होता तसे भाजपा करतेय का थेट प्रश्नावर किरीट सोमय्यांनी हसतच प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते असे सांगत वेळ मारून नेली.
००००
