मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन
मुंबई : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पालिकेने सुरू केली आहेत. आतापर्यंत १५ दिवसांत म्हणजे १ एप्रिलपर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मिठी नदीची ४८.५८ टक्के सफाई करण्यात आली आहे. अशात ३१ मेपूर्वी १०.२१ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन महापालिकेचे आहे.
महापालिकेने मुंबईतील मिठी नदी, लहान- मोठे नाले, हायवेलगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे काम ३१ कंत्राटदारांवर सोपवले आहे. गतवर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती.
मात्र, यंदा १८ मार्चपासून नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाई कामे उशिराने सुरू झाली असून ती कामे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात आणि पावसानंतर अशा तीन टप्प्यात करणे पालिकेसमोर आव्हान असणार आहे.
यंदा १८ मार्चपासून मिठी नदी, लहान व मोठे नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून १ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १५ दिवसांत मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. शहर व उपनगरांतील लहान- मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य आहे.
कामावर सीसीटीव्हीची नजर
मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत मुंबईत एका दिवसात तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता. तसेच, त्याचवेळी समुद्राला मोठी भरतीही होती. त्यामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ मोठी हानी झाली. त्यानंतर मिठी नदीची सफाई केली जाते.
नदीच्या रुंदीकरण, खोलीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील छोट्या- मोठ्या नालेसफाईची कामेही हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मिठी नदी व नालेसफाईवर पालिकेकडून सीसीटीव्हीची नजर ठेवली जाणार आहे.
दीड लाख मेट्रीक टन गाळ काढला
शहर व उपनगरे येथील लहान-मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून त्यापैकी १,६८,६७४.७७ मेट्रिक टन म्हणजे १६.५१ टक्के इतका गाळ काढण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
१) १८ मार्च ते १ एप्रिल या १५ दिवसांत कंत्राटदारांनी १,६८,६८४.७७ मे. टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.
२) शहर भागात नालेसफाई कामाच्या अंतर्गत ३०,९३९.९४ मे. टन इतका गाळ काढणे अपेक्षित असून गेल्या १५ दिवसांत त्यापैकी १,७५०.१४ मे. टन (५.६३ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.
३) पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे. टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १५,७९०.७८ मे. टन (१२.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.
४) पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे. टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी ३०,४२९.१२ मे. टन (१२.९४ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.
