अंबरनाथ : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उभे राहण्याची वल्गना करणारे नेते गेले कुठे? असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना विचारलाय.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी शनिवारी अंबरनाथच्या खेर विभागातील हेरंब मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष अभय सोमण यांनी त्यांचे स्वागत केले. कल्याण मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे निवडणुकीला उभे राहण्याची कुणाची हिम्मत झाली नाही, मतदारसंघातील नागरिक विकासकामे आणि महायुतीच्या पाठीशी उभे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वजण काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सोबतच कल्याण मतदारसंघात महायुतीमध्ये चांगले वातावरण आहे. वातावरण बिघडविण्याचे काम कुणी करत नाही आणि करत असल्यास वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांसारख्यांची नावे कल्याणमधून चर्चेत होती, मग ही नावे गेली कुठे, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, परशुराम उगले, निखिल चौधरी, विजय पाटील, मंदिराचे पदाधिकारी रत्नाकर चांदस्कर, नीलेश पाताडे उपस्थित होते.