पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. यावर रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे.
फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरलेत
ते पुढे म्हणाले की, फडणवीस साहेब आता वैतागले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी होत आहे. फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
