ठाणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा व केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन व मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे या शाळेने घवघवीत यश संपादन करत यशाचा चौकार लगावला आहे. शाळेचे तब्बल चार विद्यार्थी कु. हरिचंद्र रवि वाख, कु. प्राची लक्ष्मण विशे, कु. साई वाळकू झुगरे आणि कु.वैभव गुरूनाथ विशे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल दि.३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी व आष्टे शाळा तसेच शिक्षकवृंद आष्टे यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेच्या या घवघवीत यशात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ आष्टे यांचे तसेच आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व. काशिनाथ भोईरसर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *