पुणे येथे टॅटू स्पर्धा संपन्न
माथेरान : पुणे येथील खर्डी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या टॅटू स्पर्धेत माथेरानच्या शुभम गणपत रांजाणे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.दि.४ ते ६
सलग तीन दिवस या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दुरदुरुन टॅटू आर्टिस्ट सहभागी झाले होते. एकूण १५० जणांचा यामध्ये समावेश होता. नागपूर येथील टॅटू आर्टिस्ट याने प्रथम क्रमांक पटकावला तर माथेरानच्या शुभम रांजणे याने द्वितीय क्रमांक पटकावून सर्वांची वाहवा मिळवली. खर्डी येथील मेफिल्ड वेन्यू हॉल इथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी थायलंड येथील प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.शुभम याने गणनृत्याचा टॅटू काढून द्वितीय क्रमांक पटकावला.
२०२१ मध्ये पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये शुभम याने तीन पारितोषिके प्राप्त केली होती तर २०२३ मध्ये गोवा येथील स्पर्धेत दोन बक्षिसे प्राप्त केलेली आहेत. नुकताच पुण्यात पार पडलेल्या या स्पर्धेत शुभम याच्या नावावर दोन पारितोषिके प्राप्त करून त्याने माथेरानचे नाव उज्ज्वल केले आहे. आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पस्तीस हजार रुपये किंमतींची टॅटू मशीन बक्षीस स्वरूपात शुभम रांजाणे याना देण्यात आली आहे.या यशाबद्दल शुभमला विचारले असता त्याने सांगितले की माझ्याकडे ही छोटी कला अवगत झाली आहे त्या माध्यमातून विविध स्पर्धेत विजयश्री खेचून माझ्या गावाचे नाव उंचावेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. माथेरान मधील मित्र परिवाराने शुभम यांच्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आहे.
