नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असलेला निकाल न मिळाल्यास राहुल गांधी यांनी राजकारणातून माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाबद्दलही चिंता व्यक्त केली. गेल्या १० वर्षांत काँग्रेस पक्षाची वाताहात झालेली असतानाही राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे दुसऱ्याच्या हाती दिली नाहीत. हे लोकशाहीविरोधी आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले.
“आपल्या मर्यादा ओळखून त्या अधोरेखित करणे आणि आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे एखाद्या नेत्याचं लक्षण आहे. चांगले नेते त्यांच्यातील कमतरता मान्य करतात आणि त्या कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु, राहुल गांधी आपल्याला सर्वकाही माहीत आहे, अशा अविर्भावात असतात, असं वाटतं. त्यांच्या संकल्पना प्रभावीपणे अंमलात आणण्याकरता त्यांना इतरांची मदत घ्यावी, असं वाटत नाही”, असं प्रशांत किशोर म्हणाले.
“राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांना १९९१ मध्ये नेतृत्त्व करण्याची परवानगी दिली होती. हा संदर्भ देत राहुल गांधींनीही अशाच पद्धतीचा विचार करण्याची विनंती केली आहे. पक्षाच्या भल्यासाठी गांधींनी त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याची गरज आहे”, असा सल्ला किशोर प्रशांत यांनी दिला.
“काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना निर्णय प्रक्रियेत अडथळे येतात. कारण त्यांना अगदी किरकोळ बाबींसाठीही राहुल गांधींकडून परवानगी घ्यावी लागते”, असंही ते म्हणाले. “निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमं यांसारख्या यंत्रणांमुळे पक्षाला अडचण निर्माण झाली आहे, असं राहुल गांधी म्हणतात. मात्र, त्यांच्या या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचंही प्रशांत किशोर म्हणाले. तर, काँग्रेसमधील अंतर्गत संरचनात्मक समस्याही काँग्रेसच्या घसरत्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असं प्रशांत किशोर म्हणाले.
तसंच, किशोर यांनी काँग्रेसचे अधःपतन होत असल्याचाही दावा फेटाळून लावला. पक्षाच्या अंतर्गत त्रुटी दूर करून निवडणुकीतील प्रासंगिकता पुन्हा मिळवण्यासाठी पक्षाच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना करण्याच्या गरजेवर भर दिला.
