मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी व्हावे यासाठी काँग्रेसकडून दोन जागा वाढवून देण्याची ऑफर दिली होती. तरीही वंचितने प्रतिसाद न दिल्याने आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसहीत केंद्रात सत्ता आल्यास मंत्रीपदाचीही ऑफर दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भुमिकेवर बोलतांना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे की, “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिस अहमद यांनी दिली आहे.

२०१९ मध्ये ही प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाही. मात्र, त्यांच्यामुळे बीजेपीला फायदा होईल असे आम्ही त्यांना कळविले आहे. प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून, ते राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचेही अनिस अहमद म्हणाले आहे.

महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. अनेक बैठकींना आमंत्रण मिळत नव्हते आणि अपेक्षित जागा देखील दिल्या जात नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या एकला चलो रे भुमिकेचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत होणारे हे नुकसान पाहता काँग्रेस पक्षाकडून आंबेडकरांची मनधरणी केली जात असल्याचे बघायाला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आग्रही आहेत. “आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करण्यासाठी तयार आहोत, तुम्हाला पाहिजे असलेल्या जागा पण द्यायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांना ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला सुद्धा तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून, मतांचं विभाजन नको यासाठी आंबेडकरांनी एकत्र यायला पाहिजे असेही” पटोले म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *