दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे
मुंबई : संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आणि त्या वैभवशाली रंगभूमीला पुन्हा एकदा रसिकांसमोर साकारण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे विमल ट्रस्ट आणि दिलीप काटदरे यांच्या सहकार्याने १२ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत संगीत नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक १२ एप्रिल या दिवशी अमृत नाट्य भारती मुंबई मराठी साहित्य संघ नाट्य शाखा प्रस्तुत ‘संगीत माऊली’ हे नाटक सादर होणार आहे. साहिल विशे, तन्वी गोरे, श्रेयस व्यास आणि डॉ. गौरी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे लेखक आणि गीतकार श्री प्रदीप ओक असून दिग्दर्शन प्रमोद पवार आणि संगीत डॉ. राम पंडीत यांचे आहे.
शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी मराठी रंगभूमी, पुणे व गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत आणि कै. विद्याधर गोखले लिखित ‘संगीत सुवर्णतुला’ हे नाटक सादर होणार आहे. चिन्मय जोगळेकर, निनाद जाधव आणि अस्मिता चिंचाळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन दिप्ती भोगले यांनी केले आहे.
रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी कलाद्वयी, पुणे निर्मित प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘संगीत मत्स्यगंधा’ हे नाटक सादर होणार आहे. चिन्मय जोगळेकर, संजय गोसावी, ओंकार खाडिलकर आणि अस्मिता चिंचाळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन आशुतोष नेर्लेकर व संगीत कै. पं. जितेंद्र अभिषेकी आणि संगीत मार्गदर्शन संजय गोगटे यांचे आहे.
ही तिन्ही नाटके दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहामध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहेत. नाटकांच्या प्रवेशिकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दूरध्वनी ०२२-२४३०४१५० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.