मुंबई : शिवसेना उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करत राहिली. मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देवू असा प्रस्ताव त्यांच्याकडून आला. त्यास होकार दिला असता तर स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागला असता, पण ते शक्य नव्हतं. मी शिवसेनेकडून निवडणूक लढावं असं संजय राऊत म्हणत असतील तर ते माझ्या स्वाभिमानी संघटनेत येणार आहेत का असा प्रतिप्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी  पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीतलं वातावरण तापलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस ही जागा लढवत आली आहे. मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाने या जागेवर त्यांचा उमेदवार जाहीर केल्यामुळे आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसच्या तिकीटावर या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. या जागेवर ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी काँग्रेसने या जागेवरील त्यांचा दावा सोडलेला नाही. तर ठाकरे गटानं म्हटलं आहे की, आम्ही कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज दुसरे यांच्यासाठी (काँग्रेस) सोडली आहे. त्याबदल्यात आम्ही सांगलीत आमचा उमेदवार दिला आहे. यावरून ठाकरे गटावर टीका होत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीदेखील ठाकरे गटावर टीका केली आहे. राजू शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला आहे. तसेच आता सांगलीत वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय.
राजू शेट्टी म्हणाले, महायुतीत किंवा महाविकास आघाडीत सहभागी का झाला नाहीत? या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांशी आम्ही २०१४ मध्ये फारकत घेतली आहे. तसेच आम्ही महविकास आघाडीबरोबर जाणार नाही हेदेखील सहा-सात महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. तरीही काही माध्यमांनी आम्ही मविआबरोबर जाणार असल्याच्या बातम्या चालवल्या. भाजपा जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. हे लोक शेतकऱ्यांना फसवत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही.
स्वाभिमानीचे प्रमुख म्हणाले, मला सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर मी आमदार होतो तेव्हाच एखाद्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता आणि राजकीय कारकीर्द घडवली असती. माझ्याविरोधातील उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे आमची ही लढाई कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी आहे. उध्दव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला, सांगलीतसुध्दा वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *