डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील एका बस थांब्याजवळील सोनमोहोर झाडावर एक कावळा पतंगीच्या मांजाच्या जाळ्यात सोमवारी सकाळी अडकला होता. मांजाचा फास कावळ्याच्या पाय, पंखाला लागल्याने कावळ्याला उडणे शक्य होत नव्हते. झाडाच्या टोकाला कावळा असल्याने स्थानिकांनी पालिका अग्निशमन जवानांना घटनास्थळी बोलविले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून कावळ्याची मांजाच्या फासातून सुखरूप सुटका केली.

मांजाच्या फासामुळे कावळ्याच्या पंख, पाय आणि मानेला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी प्राणी मित्रांनी दवाखान्यात नेले. डोंबिवली एमआयडीसीतील शेवटच्या निवासी बस थांंब्याजवळील एका सोनमोहोर झाडावर एक कावळा पतंगीच्या अडकेलेल्या मांज्याला फास लागून लटकत असल्याची माहिती या भागातील एक पानटपरी चालक शत्रुघ्न सोनोने यांनी स्थानिकांना दिली. इतर कावळ्यांंनी अडकलेल्या कावळ्याच्या सुटकेसाठी काव काव गलका सुरू केला होता. झाडाच्या टोकाला एका बाजूला कावळा अडकल्याने त्याला काठीने सुखरूप बाहेर काढणे शक्य नव्हते.

ही माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी पालिक अग्निशमन विभागाला दिली. जवानांनी बांंबूच्या काठीने आणि त्याला लावलेल्या विळ्याने कावळा अडकलेल्या भागापर्यंत काठी नेली. पीडित कावळ्याला कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही अशा पद्धतीने जवानांनी कावळ्याला मांजाचा दोरा तोडून खाली ओढले. काही अंतरावर कावळा मांजा तुटल्याने जमिनीवर पडला. त्याला तत्काळ प्राणी मित्र अभिजीत पाटील, हर्षदीप जाधव यांनी प्राथमिक उपचार करून अधिकच्या उपचारासाठी पशुवैद्यक डाॅक्टरांकडे नेले.

अग्निशमन दलाचे पाचशे सेवा शुल्क सोनोने, नलावडे यांंनी बचाव पथकाकडे दिले. सार्वजनिक ठिकाणी झाडावर, मांजात अडकलेल्या प्राण्यांची सुटका करताना अग्निशमन दलाकडून संपर्क करणाऱ्या नागरिकाला पहिलेच संबंधित प्राण्याच्या बचावासाठी ५०० रुपये शुल्क भरणा करावे लागेल, असे सांंगितले जाते. अशाप्रकारचे शुल्क प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी आकारू नये, अशी मागणी पक्षी, प्राणी, सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *