ठाणे : संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील निनावीदेवी पालखी नृत्य पथकाने अव्वलस्थान पटकावले. तर, गंगोबा नृत्य पथकाने दुसरे आणि कालकाई पथकाने तिसरे पारितोषिक पटकावले.

रविवारी कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात आली होती. या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक ऊक्षी, ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी,  आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी, पदमावती मार्गताम्हाणे गुहागर  जय त्रिमुख मठ लांजा, श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर, साडवली श्री देवी वाघजाई साडवली संगमेश्वर  येगांव चिपळूण, कुशिवडे काळकाई चिपळूण, नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता.  या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी या पथकास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्या गंगोबा नृत्य पथक , करंबळे या पथकास    एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या कालकाई पालखी नृत्य पथकास एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी संघाना  प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *