नागपुर : मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा द्यावा असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४ मध्ये राज ठाकरे असे व्यक्ती होते, ज्यांनी जाहीरपणे भूमिका घेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायला हवे, असे म्हटले होते. मात्र, मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली. गेल्या १० वर्षांत ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी भारताचा विकास केला. एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली, हे आता त्यांनाही मान्य झाले असेल. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्याकरिता राष्ट्र प्रथम आहे, समाज प्रथम आहे, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहायला हवे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा
राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहतील. राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा असेल. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. महायुतीत ज्या काही जागा आहेत, त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत. प्रचाराला आता लागले पाहिजे. कारण, उमेदवार कुणीही असला तरी प्रचार कामी येतो. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी यांसह मित्र पक्षांनी जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत, तिथे तयारी केली पाहिजे, असे आम्ही ठरवले आहे. मेळावे घ्या, असेही सांगितले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एकनाथ खडसे यांचे स्वागतच करू
एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, भाजपामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कुणीही प्रवेश करत असेल, तरीदेखील त्या ठिकाणी कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पक्षाने आम्हाला याबाबत कळवले नाही. पण अधिकृतरित्या पक्ष आम्हाला कळवेल, तेव्हा त्यांचे आम्ही स्वागतच करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
