जामीन फेटाळला;ईडीची कारवाई योग्यच

नवी दिल्ली:  दिल्लीचे अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई योग्य ठरवली आहे. अटक योग्य की चूक हे कायद्याच्या आधारे ठरते, निवडणुकीच्या वेळेनुसार नाही, अशी टिप्पणी यावेळी उच्च न्यायालयाने केली. यावेळी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळून लावली.

दिल्लीतील मद्य धोरणातील गैरव्यवहारप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली कोर्टाच्या या निकालाविरोधात केजरीवाल आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत.

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तब्बल 9 वेळा समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल एकदाही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे ईडीने 21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तेव्हापासून अरविंद केजरीवाल हे ईडीच्या कोठडीत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी देशभरात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीकडून दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ सभाही घेण्यात आली होती. त्यामुळे अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांच्याविषयी जनमानसात सहानुभूती निर्माण होताना दिसत होती.

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती स्वर्ण कांत शर्मा यांनी निकालचे वाचन करताना अरविंद केजरीवाल यांना एकप्रकारे फटकारल्याचे सांगितले जाते. उच्च न्यायालय ट्रायल कोर्टाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. ईडीने समोर आणलेले पुरावे पाहता अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर नाही. अरविंद केजरीवाल यांनी कट रचून दिल्ली मद्य धोरणाला परवानगी देण्यात महत्वाची भूमिका बजावली. केजरीवाल यांची अटक वैध आहे. त्यामुळे केजरीवाल यांची याचिका फेटाळण्यात येत आहे.  अटक योग्य की चुकीची कायद्याच्या आधारे ठरतं, निवडणुकीच्या वेळेनुसार नाही, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *