मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सुपारी देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती असे सांगून खळबळ उडविणाऱ्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या पुन्हा बरळले आहेत. राज्याच्या हितासाठी काही कॉम्प्रमाईज करावं लागतं असं सांगत आतापर्यंत ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यांच्या शेजारी आता बसावं लागतंय, हे फक्त देशाच्या आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सहन करतोय असं वक्तव्य त्यांनी केलं.
आतापर्यंत आपण अनेकांची भ्रष्टाचार बाहेर काढले, आपल्यामुळेच देशाला माहिती झालं की एखाद्या राजकारण्याने जर भ्रष्टाचार केला तर त्यालाही शिक्षा होऊ शकते, याचं समाधान आहे असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
ज्यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले त्यांना तुरुंगात न पाठवता सरकारमध्ये मोठी मंत्रिपदं दिली जातात, त्यावर काय वाटतं असा प्रश्न विचारल्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, आपण ज्यांच्यावर आरोप केले तेच आता आपल्या सोबत सत्तेत आहेत. याबद्दल मला सातत्याने विचारलं जातंय. मलाही रोज सकाळी उठल्यावर हाच प्रश्न पडतोय. ज्यांचा आरोप आपण बाहेर काढला त्या घोटाळेबाज आणि बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, त्याचं स्वागत माझ्या पक्षात होतंय हे योग्य आहे का असं रोज वाटतंय. पण देशाच्या आणि राज्याच्या ‘लार्जर इंटरेस्ट’साठी मी हे सहन करतोय, हा त्याग करतोय.
आता काही कॉम्प्रमाईज करावं लागतंय, पण यापुढे असं होणार नाही असं सागंत किरीट सोमय्या म्हणाले की, मोठा भ्रष्टाचार संपवण्यासाठी हे करावं लागतंय. आताच्या सरकारमधील एका मंत्र्याने त्याच्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यावर मी फाईल तयार करून पाठवली. त्यानंतर ते थांबलं.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जर प्रायश्चित केलं तर, यापुढे जर लुटमार आणि भ्रष्टाचार न करण्याचा संकल्प केला तर मोदीसाहेब त्यांना जवळ करतील असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं.