नवी मुंबई : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची गणना सुरू आहे. आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमांतर्गत ही गणना केली जात असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या गणनेत देशी आणि स्थलांतरित अशा एकूण ४७ पाणपक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत.

नवी मुंबई शहराच्या पूर्वेला सह्याद्री डोंगररांग आहे; तर पश्‍चिमेला विस्तीर्ण असा खाडीकिनारा आहे. एकूण १९.९२ वर्ग मीटरमध्ये खाडीतील खाजना क्षेत्र आहे. या खाडीकिनाऱ्यावर पक्ष्यांसाठी पोषक असणारी मोठी जैवविविधता आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यावर दरवर्षी हजारो स्थलांतरित, देशी पक्षी आपल्या निवाऱ्यासाठी घिरट्या घालत असतात. यात स्थलांतरित परदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांचीही मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येते; मात्र या पक्ष्यांची अधिकृत प्रजाती संख्या नवी मुंबई महापालिकेकडे नाही. यंदा आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमांतर्गत खाडीकिनाऱ्यावरील पक्ष्यांची गणना करण्यात येणार असून त्याची नोंद ठेवली जाणार आहे.

खासगी संस्थेमार्फत गणना

नवी मुंबई महापालिका पर्यावरण विभागानेदेखील यंदा पाणथळ क्षेत्रातील पक्ष्यांची गणना करण्यास सुरुवात केली आहे. याधी शहरात खासगी पक्षी संस्था स्वयंस्फूर्तीने पक्षीगणना करत असत आणि त्याची नोंद महापालिकेकडे नसायची. यंदा प्रथमच महापालिकेच्या माध्यमातून आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमांतर्गत एका खासगी सस्थेमार्फत ही गणना केली केली आहे.

२७ स्थानिक देशी पक्षी

नवी मुंबईतील १० पाणथळ क्षेत्रांत विविध दिवशी भरती, ओहोटी तसेच सकाळ, सायंकाळ अशा वेळा साधून ही गणना करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ४७ पाणपक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यात २० प्रजाती या स्थलांतरित; तर २७ प्रजाती या स्थानिक देशी पक्ष्यांच्या आढळून आल्या आहेत, अशी माहिती बासिल एन्व्हायरोमेंटल सर्व्हिसेसचे निकेश देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *