मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले होते.
त्यानुसार एनआयएने प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा वैद्यकीय अहवाल सादर करत प्रज्ञासिंग यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना तूर्त आरामाची गरज असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेताना प्रज्ञासिंग यांना २० एप्रिलपासून सुनावणीला हजर राहावे असे निर्देश न्यायालयाने दिले.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपी असून त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे.
साध्वी प्रज्ञासिंग वारंवार प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत गैरहजर राहतात. त्यांच्यामुळे बॉम्बस्फोट खटला रखडतोय, असे ताशेरे ओढत न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रकृतीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश एनआयएला दिले होते.
त्यानुसार तपास यंत्रणेने सोमवारी विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यापुढे अहवाल सादर केला. प्रज्ञासिंग यांची तब्येत ठीक नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तूर्त आरामाची गरज असल्याचे एनआयएने कळवले. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रज्ञासिंग यांना हजेरीपासून सूट दिली. मात्र २० एप्रिल व त्यापुढील तारखांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ३१३ अन्वये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावेच लागेल, असे प्रज्ञासिंग यांना बजावले.
