महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने पार बिघडवले आहे असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला आहे. गेल्या दोन वर्षात भाजपने इतर पक्ष फोडले आणि सत्ता मिळवली अशी टीका त्यांनी यावेळी केली.
दुसरा पक्ष फोडून सत्ता मिळवणे म्हणजेच राजकीय वातावरण बिघडवणे असा अर्थ होत असेल तर नानांनी थोडे इतिहासात डोकावायला हवे. महाराष्ट्रापुरते बोलायचं झाले तर १९७८ मध्ये त्यावेळच्या रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या शरश्चंद्र गोविंदराव पवार यांनी सर्वप्रथम आपलाच पक्ष फोडून मुख्यमंत्रीपद मिळवले होते आणि या फुटीला समाजवादी काँग्रेस असे गोंडस नाव दिले होते.हा इतिहास अजूनही ताजा आहे. त्यावेळी या मारामारीत ज्यांचे मुख्यमंत्रीपद गेले त्या वसंतदादा पाटील यांनी पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला होता. महाराष्ट्रात पक्ष फोडून सत्ता मिळवण्याची ही सुरुवात होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
याच महाराष्ट्रात १९९० मध्ये सत्तेत आलेले काँग्रेस सरकार हे पूर्ण बहुमताचे नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते शरद पवार हे सभागृह व्यवस्थापनात चतुर असल्यामुळे अल्पमतातील सरकारही त्यांनी सुमारे दोन वर्ष चालवले. नंतर त्यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वात तत्कालीन शिवसेना कडूनच फोडूनच आपले सरकार स्थिर केले होते ना. त्यावेळी त्याच पाठोपाठ जनता दलाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले काही आमदार पवारानंतरचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनीही काँग्रेसमध्ये आणले होते. मग त्यावेळी राजकीय वातावरण फार चांगले होते असे म्हणता येईल का याचे उत्तरही आता नानांनीच द्यावे.
नानांच्या माहितीसाठी आम्ही हे जुने संदर्भ दिले. पण अगदी ताजे म्हणजे पाच वर्षाआधीचे संदर्भ तर नानांना लक्षात असतीलच. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांनी युती करून निवडणूक लढवली होती. या युतीला जनतेने कौल दिला होता, आणि भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ अशा जागा देऊन या युतीला स्पष्ट बहुमत देत सत्तेत जाण्याचा आदेश दिला होता. याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विरोधात बसावे असाही जनादेश होता.
मात्र त्यावेळी जनादेश झुगारत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी हात मिळवणी केली आणि शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आणले. या अभद्र युतीला काँग्रेसने ही साथ दिली आणि या तिघाडीत नानांनी सुद्धा विधानसभा अध्यक्षपद मिळवले. असा जनादेश झुगारत मिळवलेली सत्ता ही देखील राज्यातले राजकीय वातावरण बिघडवणारी नव्हती का याचेही उत्तर आम्ही नानांनाच विचारतो आहे.
हे आम्ही महाराष्ट्रातले संदर्भातील असे अनेक संदर्भ देशाचे राजकारण तपासले तर आढळून येतील. १९९१ मध्ये केंद्रात सत्तेत आलेले पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार ही अल्पमतातच होते. मात्र त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांशी समन्वय साधत नरसिंहरावांनी काही काळ सरकार चालवले. नंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचा सत्तेत सहभाग कसा मिळवला हा इतिहासही ताजा आहे. त्यानंतर नरसिंहरावांवर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोपही झाले होते. त्यांचे पंतप्रधानपद गेल्यानंतरही त्यांना अनेक चौकशांना सामोरे जावे लागले होते.
थोडे मागे गेले तर १९८० साली केंद्रात सत्तांतर झाले आणि काँग्रेसचे इंदिरा गांधी सरकार सत्तेत आले. त्यावेळी राज्यांमध्ये जनता पक्षाची म्हणजेच काँग्रेस विरोधकांची सरकारी सत्तेत होती. हरियाणामध्ये जनता दलाचे भजनलाल हे मुख्यमंत्री होते. हे सरकार बरखास्त करण्याची केंद्रातील इंदिरा गांधी सरकारची हालचाल सुरू होती. हे कळताच भजनलाल आपल्या पक्षातील सर्व आमदारांसह जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि “बिना खडग बिना ढाल” तसेच कोणताही रक्तपात न घडता हरियाणात कथित क्रांतिकारी सत्तांतर घडले. यामुळेही राजकारण बिघडले नव्हते असाच दावा नाना पटोले करतील हे नक्की.
भारतातील संसदीय लोकशाही पद्धती ही जगात अतिशय चांगली असली तरी आजही त्यात काही त्रुटी आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन सर्वच पक्ष सत्तेसाठी काहीही करायला तयार असतात. हिंदी भाषेत एक म्हण आहे. ती अशी की हमाम मे सब नंगे होते है. याचाच अर्थ आपल्या स्वार्थासाठी सर्वजण साधनशुचीता विसरून वाटेल ते करायला तयार होतात. मात्र दुसऱ्यावर वेळ आली की टीका करायला तयार असतात.
महाराष्ट्रात सध्या तेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १९७८ पासून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल ठेवलेला होता. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यामुळे तो रिमोट कंट्रोल हातातून सुटला. त्यातही सुरुवातीला आपल्या हातात रिमोट कंट्रोल राहील या आशेने भाजपला सत्तेसाठी काही जागा कमी पडत असताना पवारांनी सरकार बनवण्यासाठी भाजपला विनाअट पाठिंबा देऊन टाकला होता. नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी जुळवून घेत पवारांना बाजूला ठेवले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुढचे पाच वर्ष सत्तेबाहेर होते. परिणामी अस्वस्थ झालेल्या पवारांनी डाव टाकत भाजपच्या जागा थोड्या कमी होत आहेत हे बघून शिवसेनेला ताब्यात घेतले, आणि महाराष्ट्रात महाआघाडीचा प्रयोग केला. हा जनादेश नाकारण्याचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ करण्याचाच प्रकार होता. मात्र त्यावेळी हा नवा प्रयोग म्हणून नाना पटोले यांनी देखील याला डोक्यावर घेतले होते. मग तुम्ही जसे शिवसेनेला महायुतीतून फोडून आपल्याकडे ओढले ते जर चांगले तर मग त्याच शिवसेना आणि राष्ट्रवादीतून मोठे गट फोडून आपल्याकडून हिसकावून घेतलेली सत्ता पुन्हा मिळवली तर ते वाईट कसे होईल नाना? म्हणजे त्यांनी खाल्ले तर शेण आणि आपण केली ती श्रावणी असा तुमचा न्याय आहे का? अर्थात याचे उत्तर नाना कधीच देणार नाहीत. कारण त्यांची ही मजबुरी आहे. त्यांना आज पुरेसा जनाधार नाही. त्यामुळे सत्ता मिळण्याचे जे थोडेफार योग आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनेच येऊ शकतात. हे जाणून त्यांना पवारांची तळी उचलणे भाग आहे. ती त्यांची आधी म्हटल्याप्रमाणे मजबुरी आहे. खरोखरच आज नाना हे राजकीय दृष्ट्या मजबूर आहेत हे मान्य करावेच लागेल.