मुंबई : मतदान करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पसंती नाही, म्हणून उमेदवार आणि पक्ष नाकारणाऱ्यांसाठी नोटा हा पर्याय अनेक मतदार स्विकारतात. अशात गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघात नोटाचा पर्याय अनेक मतदारांनी स्वीकारला होता. हा पर्याय सुमारे पावणेदोन टक्केच्या दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील मतदारांनी वापरला होता. यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबईत नोटाची संख्या अधिक वाढल्यास ती मतेही विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी मोठी निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ०.८९ टक्के मतदारांनी नोटाचा वापर केला होता. त्यात नोटाचा सर्वात जास्त वापर मुंबईतील लोकसभा मतदारसंघात करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक अशी १.९४ टक्के मते मुंबई उत्तर पश्‍चिम या लोकसभा मतदारसंघात मतदारांनी नोटाचा वापर केला होता. त्या खालोखाल दक्षिण मुंबईमध्ये १.८९ टक्के, दक्षिण मध्य साऊथ मुंबईमध्ये १.७३ टक्के, उत्तर पूर्व मुंबईत १.३७ टक्के तसेच उत्तर मुंबईमधून १.२१ टक्के आणि सर्वात कमी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून १.१८ टक्के इतकी मते नोटाची होती.

यंदाच्या निवडणुकीत नोटाची मते वाढल्यास त्याचा परिणाम उमेदवारांना मिळणाऱ्या मतांवर होणार आहे. जर नोटाचा वापर अधिक झाल्यास विजयी उमेदवारांच्या मताधिक्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच परभूत उमेदवारालाही त्याचा फटका बसू शकतो, असे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. त्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी ही नोटाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आदिवासीबहुल भागात सर्वाधिक वापर

मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक नोटाचा वापर हा आदिवासीबहुल जिल्ह्यांत करण्यात आला होता. यामध्ये पालघर मतदारसंघात २.४५ टक्के, गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात २.१५ टक्के, नंदूरबार मतदारसंघात १.७१ टक्के इतके मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

येथे सर्वात कमी वापर

२०१९च्या निवडणुकीत सर्वात कमी नोटाचा वापर हा माढा मतदारसंघात केवळ ०.३ टक्के इतका झाला होता. त्याखालोखाल बारामती- ०.६ टक्के, बीड- ०.१८ टक्के, धुळे- ०.२३ टक्के, नगर, यवतमाळ- वाशिम प्रत्येकी ०.३४ टक्के, परभणी- ०.३६ टक्के, हिंगोली- ०.३७ टक्के, नागपूर- ०.३९ टक्के, औरंगाबाद- ०.४१ टक्के आणि सांगली- ०.५५ टक्के इतकी मते ही नोटावर पडली होती.

मुंबईलगतच्या जिल्ह्यातही वापर

मुंबईशेजारी असलेल्या लोकसभा मतदारसंघापैकी ठाण्यामध्ये १.७४ टक्के, कल्याणमध्ये १.४८ टक्के, भिवंडी- १.६३ टक्के आणि रायगडमध्ये १.१२ टक्के आणि कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात १.५३ टक्के मतदारांनी नोटाचा वापर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *