गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर ठाण्यात भाजपच्या नूतन कार्यालयाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे : भाजपचे नूतन कार्यालय ही एक वास्तु, इमारत नाही तर, परिवार आहे.तेव्हा, शासन, संघटन आणि जनता यामधील सेतु म्हणून हे कार्यालय काम करील. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भाजपच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी, विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या कार्यकाळात ठाण्यात सुरु झालेल्या भाजपच्या प्रशस्त कार्यालयामुळे कार्यकर्त्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यालयाला महत्व आले असुन येथुनच जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा भाईंदर नवी मुंबई, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हे कार्यालय दुवा ठरणार आहे.ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आवारात दुमजली कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला ना.कपील पाटील,ना. रविंद्र चव्हाण,आ. संजय केळकर,आ. गणेश नाईक, आ. निरंजन डावखरे, माजी खा. डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, मा. खा.संजीव नाईक, आ.श्रीकांत भारतीय, ठाणे लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकुर,आ.गीता जैन, आ. मंदा म्हात्रे, आ.रमेश पाटील, महेश चौगुले, महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विणा भाटीया, सुरेश हावरे आदींसह भाजपचे ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी भाजप कार्यालयासाठी पाठपुरावा करणारे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच कार्यालयाच्या उभारणीत योगदान देणारे कर्नल बक्षी यांच्यासह, हर्ष सुरेंद्र हिरानंदानी, सौरभ परांजपे, रेमंड ग्रुपचे संदीप माहेश्वरी, संजीव शरीर, महेश लाड,अंकुश गुप्ता, हनीफ खान, वैभव दिक्षीत यांचा सन्मानही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, ५०० वर्षानंतर अयोध्येत श्रीरामाची मुर्ती स्थापन झाली,त्यानंतरचा हा पहिलाच गुढी पाडवा आहे. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी देशात आणि महाराष्ट्रात उंचच उंच गेली पाहिजे.अशी प्रार्थना केली. तसेच, अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर भाजपचे हे नूतन कार्यालय उभे राहिले असुन हे कार्यालय डोनेशनमध्ये नाही तर, वाजवी किंमत देऊन निर्माण केल्याचे आवर्जुन नमुद केले.आजकाल नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी वाढेल हे पाहतात. मात्र भाजपचे कार्यकर्ते पक्षाची प्रॉपर्टी कशी वाढेल, याला प्राधान्य देतात. हाच भाजप आणि इतर पक्षात फरक आहे. असे नमुद करून फडणवीस यांनी, कार्यालय हे आपले घर असते, कार्यालय ही एक अशी जागा असते की, ज्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते. हे हक्काचे स्थान असुन ही एक वास्तु, इमारत नाही तर, परिवार आहे.तेव्हा, शासन, संघटन आणि जनता यामधील सेतु म्हणून हे कार्यालय काम करील.अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी प्रास्तविकात आ. निरंजन डावखरे यांनी, वास्तु नेहमीच तथास्तु करीत असते. २० हजार बिल्टअप आणि साडेतेरा हजार चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळात सौर ऊर्जायुक्त संपूर्ण ई इमारत उभी राहीली आहे. त्याची आज स्वप्नपूर्ती होत असताना आनंद होत असल्याचे सांगितले.तर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी, भाजपच्या हक्काच्या कार्यालयासाठी योगदान देण्याचे भाग्य लाभल्याचे नमुद करून उपस्थित मान्यवरांसह सर्वाचे आभार मानले.
ठाण्यातील पहिले अद्ययावत कार्यालय
भारतीय जनता पक्ष तळागाळात रुजण्याच्या दृष्टीने देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपचे स्वतःच्या मालकीचे पक्ष कार्यालय असावे, या हेतूने गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी भाजप जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलीत. याच धर्तीवर ठाण्यातील वर्तकनगर येथे भाजपचे नवे प्रशस्त ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालय उभारण्यात आले आहे. या अद्ययावत कार्यालयाच्या आवारात १०० फुटी भव्य ध्वजस्तंभ लक्ष वेधुन घेतो. सौर उर्जेचा वापर केलेल्या या कार्यालयात शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षासाठी दोन कचेऱ्या, इलेक्ट्रॉनिक डिजीटल डिस्प्लेसह प्रेसरूम, वॉर रूम, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग रूम, भाजपच्या सर्व प्रकोष्ठाकरीता वेगवेगळ्या कॅबिन्स, ५०० सदस्यांची क्षमता असलेले ऑडिटोरियम रूम सज्ज असल्याने जिल्हास्तरीय बैठका, विविध कार्यक्रम, नेत्यांच्या पत्रकार परिषद याठिकाणी होणार आहेत. पार्किंगची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली असून एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर या कार्यालयाची रचना करण्यात आलेली आहे.
भाजप करिता ‘ठाणे’ महत्वाचे पण …
महायुतीमधील जागावाटपात ‘ठाणे’ लोकसभेसाठी कोण ? ही प्रतिक्षा सुरु असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतीही हेडलाईन देणार नसल्याचे सांगुन गुढ वाढवले. ठाणे विभागात भारतीय जनता पक्षाचे अतिशय जुनें काम आहे. यात अर्थातच आपले मित्रपक्ष देखील आपल्यासोबत याठिकाणी वारंवार राहिले आहेत. पण ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे काम सातत्याने मजबुतीने वाढले आहे आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून पुढे येत आहे. विविध निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळत असल्याने ठाणेकर जनता अतिशय ताकतीने भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळेच भाजप करीता ठाणे महत्वाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
