काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई:  खोटी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

 सुधीर मुनगंटीवार यांनी काल मोदींच्या प्रचारसभेत केलेल्या एका वक्तव्यावर काँग्रेसने मोठा आक्षेप घेतलाय. यावर सोशल मीडियावर देखील मोठा गदारोळ झाला आहे. यावर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या अटकेची मागणी नाना पटोलेंनी केलीय. त्यावर आपण जे वक्तव्य केलं त्याला आणीबाणी आणि 1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ आहे अशी सारवासारव सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. तर काँग्रेसकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नसल्याने काँग्रेसकडून खोटे आरोप करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

चंद्रपूर येथे झालेल्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता अपशब्द वापरल्याने काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.  जालन्यात काँग्रेसच्यावतीने त्यांच्या वक्तव्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलीय.

महाराष्ट्रात असे वक्तव्य करुन सुधीर मुनगंटीवार यांनी लायकी दाखवली आहे. निवडणूक आयोगात आम्ही तक्रार करणार आहे, असे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

सुधीर मुनंगटीवार यांचा पलटवार

सुधीर मुनंगटीवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपावर म्हटले की, 1984  साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप व्हायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही असा इशाराही दिला. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नसल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *