राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन उमेदवार जाहीर

मुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे तर रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहिर केली आहे. आतापर्यंत शरद पवार यांनी आपल्या कोट्यातील 10 पैकी 9 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माढा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार शिवसेना ठाकरे गट  २१, काँग्रेसला १७ आणि राष्ट्रवादीला  १० जागा मिळाल्या आहेत.

सातारा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी शशिकांत शिंदे यांचा सामना होण्याची शक्यता आहे. साताऱ्याची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोट्यात आहे  , मात्र भाजपने या जागेवर   दावा केला आहे  .  उदयनराजे भोसले यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती . मात्र, महायुतीने अद्याप सातारा च्या  जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

उमेदवारी मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले की, हा जिल्हा यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून या जिल्ह्याने मजबूत ताकद निर्माण केली आहे. माझा लढा कोणाही व्यक्तीविरोधात असणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा हा माझा लढा असेल. या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या खासदाराची गरज आहे. श्रीनिवास पाटील आणि यापूर्वीच्या खासदारांनी केलेल्या कामाचा आदर्श घेऊन मी काम करेन. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर साताऱ्यातून निवडणूक जिंकली, मात्र सहा महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव झाला. यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.

उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सपाचे उमेदवार श्री राम पाटील यांचा सामना भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे. रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. राष्ट्रवादीचे पवार गटाचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे. रक्षा खडसे 2014 आणि 2019 मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या, मात्र यावेळी त्यांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे. अशा स्थितीत एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश करून रक्षा खडसेंचा विजयाचा मार्ग सुकर करायचा असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीचे जाहीर झालेले उमेदवार

वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे, अहमदनगरमधून नीलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, भिवंडीतून सुरेश म्हात्रे, साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *