स्वाती घोसाळकर
मुंबई : वानखेडेवर कालनिर्णयच्या पंचागाप्रमाणे ६.५५ मिनिटांनी सुर्यास्त झाल्यावर कॅप्टन हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी उतरला खरा पण त्यानंतर रात्रीच्या अंधारात मुंबईचा सूर्य अखेर तळपळा. वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या फटकेबाजीने चहात्यांचे डोळे दिपवले. त्याची बॅट अखेर दणाणली. सूर्याने मैदानाच्या चोहोबाजूने फटकेबाजी करत उपस्थित प्रेक्षकांची मने तर जिंकलीच पण त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्वाचा वाटा उंचलला, मुंबईने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
मुंबई इंडियन्सची सुरुवात आक्रमक झाली. ईशान किशन आणि रोहित शर्माने आक्रमक खेळी करत मुंबईला भक्कम सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ईशानने ३४ चेंडूत ६९ धावा केल्या. ईशान आऊट झाल्यानंतर मैदानात आला तो सूर्यकुमार यादव. रोहितच्या साथीने सूर्याने आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. १७ चेंडूत पाच चौकार आणि ४ षटकारच्या सहाय्याने सूर्याने आपलं अर्धशतक झळकावलं. आणि अखेर आरसीबीविरुद्ध सूर्याची बॅट तळपली. सूर्या हा सामना लवकर संपवणार असं वाटतं असतानाच व्यशकने त्याची विकेट घेतली. पण तोपर्यंत मुंबई इंडियन्स विजयाच्या समीप आला होता. शेवटी कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माने मुंबई इंडियन्सचा या मोसमतला दूसरा विजय मिळवून दिला. मुंबईने पाच सामन्यात दोन विजय नोंदवत गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून रॉयल्स चॅलेंजर बंगलोरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. मॅचच्या सुरवातीपासून बूमराह आणि विराट कोहली यांच्यातल्या ‘वॉर’ची चर्चा रंगली होती. पण पुन्हा एकदा बूमराहने विराट कोहलीला बाद करत आरसीबीला पहिला मोठा धक्का दिला. या विकेटनंतर आयपीएलच्या इतिहासात बूमराहने विराटला बाद करण्याची ही पाचवी वेळ ठरली. त्यानंतर फाफ डूप्लेसिसने मोर्चा सांभाळला. त्याने आधी रजत पतीदार आणि त्यानंतर दिनेश कार्तिकबरोबर महत्वाची भागीदारी केली. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये आरसीबीने मुंबई इंडियन्सच्या बोलर्सचा खरपूस समाचार घेतला. शेवटच्या ५ ओव्हर्सपैकी २ ओव्हर्स या जसप्रीत बूमराहने टाकल्या ज्यात त्याने १४ धावा देत चार विकेट्स घेतल्या. पण दुसरीकडे ३ ओव्हर्समध्ये आरसीबीने ५२ धावा ठोकल्या. त्यामुळे शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये एकूण ६६ धावा दिल्या गेल्या. आकाश मढवालचा संपूर्ण सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी समाचार घेतला. अशातच शेवटची ओव्हर पुन्हा त्याला दिल्यामुळे हार्दिकच्या या निर्णयावर सगळ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. शेवटच्या ओव्हरमध्ये मढवालच्या गोलंदाजीवर १९ धावा थोकल्या. त्यातच महत्वाचं म्हणजे या मॅचमध्येही मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने फक्त एकच ओव्हर टाकली. एकंदरीत हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी अनफिट असल्याच्या चर्चेला उधाण आलेला आहे.
‘बूमरॅग’ बूमराह
मुंबई इंडियन्सतर्फे यशस्वी गोलंदाज ठरला तो जसप्रीत बूमराह. एकीकडे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना लय सापडत नव्हती, दुसरीकडे मात्र बूमराहने अचूक टप्प्यात गोलंदाजी करत आज त्याच्या संघासाठी ‘गोल्डन आर्म मॅन’ ठरला. बूमराहने ५ विकेट घेत मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर केला.