देशातील दुसरा सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह महाराष्ट्रात पुणे शहरात डेटा सेंटर उभारणार आहे. त्यासाठी अदानी समूहाने जमीन खरेदी केली आहे. या उद्योगसमूहाने डेटा सेंटर बांधण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून २५ एकर जमीन खरेदी केली आहे. हा करार अनेक कोटींचा आहे. अदानी समूहाच्या टेराविस्टा डेव्हलपर्सने डेटा सेंटर उभारण्यासाठी ही जमीन संपादित केली आहे.
खरेदी केलेला भूखंड २५ एकरांपेक्षा मोठा असून तो पिंपरी औद्योगिक क्षेत्रात आहे. अहवालानुसार, जमिनीचा हा सौदा सुमारे ४७१ कोटी रुपयांना झाला आहे.अदानी ग्रुप येथे डेटा सेंटर बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जमिनीचा हा व्यवहार झाला. हा करार ३ एप्रिल रोजी नोंदणीकृत झाला आणि समूह कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने त्यासाठी २३.५२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. खरेदी केलेली जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वस्तिक रबर प्रोडक्टस प्रथम भाडेतत्त्वावर दिली होती. १९६७ ते १९६९ दरम्यान दोन लगतच्या भूखंडांसाठी ९५ वर्षांची लीज देण्यात आली होती.
स्वस्तिक रबरने १९८२ मध्ये फिनोलेक्स ग्रुपला लीज हस्तांतरित केली. हस्तांतरणामध्ये, फिनोलेक्स ग्रुपला मूळ लीजअंतर्गत लीज कालावधी ९५ वर्षांनी वाढवण्याची सुविधा मिळाली.आता फिनोलेक्सने अदानी ग्रुपच्या कंपनीला लीज हस्तांतरित केली आहे. तथापि, अदानी समूह किंवा फिनोलेक्स समूहातील कोणीही या कराराला अद्याप अधिकृतपणे पुष्टी दिलेली नाही. डेटा सेंटर व्यवसाय हा उदयोन्मुख व्यवसाय मानला जातो. अदानी समूहाने या व्यवसायासाठी मोठी योजना तयार केली आहे. यासाठी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने ‘एजकॉनेक्स’सोबत संयुक्त प्रकल्प सुरु केला आहे.
ही कंपनी आधीच चेन्नई, नवी मुंबई, नोएडा, विशाखापट्टणम आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये डेटा सेंटर तयार करण्याचे काम करत आहे. अदानी समूहाने पुढील दशकात एक गीगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटरचे नेटवर्क तयार करण्याची योजना आखली आहे.
अंबानी-मस्क यांची टेस्लासाठी हातमिळवणी
सध्या टेस्ला भारतात येणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. टेस्ला टीम भारतात जमीन शोधण्यासाठी येत असल्याची माहिती समोर आली.त्यानंतर एलोन मस्क यांनी टेस्लाचा भारत प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे विधान केले. इलॉन मस्क भारतातील टेस्ला प्लांटमध्ये सुमारे दोन अब्ज डॉलर गुंतवतील, असे मानले जात आहे. त्यासाठी अनेक राज्यांशी बोलणी सुरू आहेत. टेस्ला आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यातील संयुक्त उपक्रमाबाबत चर्चा जोरात सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. चर्चा यशस्वी झाली तर मुकेश अंबानी आणि एलोन मस्क मिळून महाराष्ट्रात टेस्ला प्लांट उभारतील.अंबानींची ऑटोमोबाईल क्षेत्रात येण्याची इच्छा नाही. टेस्ला भारतात येण्यासाठी स्थानिक भागीदार शोधत आहे. आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी ती सुमारे महिनाभर रिलायन्स इंडस्ट्रीजशी गांभिर्याने चर्चा करत आहे. दोन्ही कंपन्यांमधील हे संभाषण सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. मुकेश अंबानी यांचा सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नाही. तथापि, इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी तो खूप उत्साहित आहे. टेस्लाची अनेक राज्यांमध्ये चर्चा होत आहे. या संयुक्त उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजची भूमिका काय असेल हे अद्याप ठरलेले नाही,असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
रिलायन्स टेस्लाला प्लांट तयार करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी पूर्णपणे मदत करेल, असे मानले जात आहे. टेस्ला गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आपल्या प्लांटसाठी जमीन शोधत असल्याचा दावा अलीकडेच करण्यात आला होता. अनेक राज्ये त्याला प्लांट उभारण्यासाठी आकर्षक ऑफरही देत आहेत.