वर्धा लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रामदास तडस हे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार म्हणून उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध इतर अनेक उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तडस यांची सून पूजा तडस या देखील एक उमेदवार आहेत. अपक्ष म्हणून त्या रिंगणात उतरल्या आहेत.
आज या पूजा तडस यांच्या साथीला शिल्लक शिवसेनेच्या एक नेत्या सुषमा अंधारे या वर्ध्याला पोहोचल्या, आणि तिथे त्यांनी पूजा तडस यांच्यासोबत पत्र परिषद घेतली. त्यात पूजा तडस त्यांचे पती पंकज तडस आणि सासरे रामदास तडस यांच्यात असलेले कथित कौटूंबिक वाद माध्यमांसमोर सांगत या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.
पूजा आणि पंकज तडस यांचे हे कथित विवाह प्रकरण तीन-चार वर्षांपूर्वीही एकदा माध्यमांसमोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार पंकज तडस यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय पूजा तडस यांच्याशी विवाह केला होता. नंतर काही काळ ते वर्ध्यातच एका फ्लॅटमध्ये राहत होते. मधल्या काळात या पती-पत्नींमध्ये वाद होऊन दोघेही विभक्त झाले. या प्रकरणात उभयतांनी परस्परांवर दावे दाखल केल्याची ही माहिती आहे. अर्थात प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर जास्त भाष्य करणे उचित होणार नाही.
एकंदरीतच हा पूर्णतः कौटुंबिक स्वरूपाचा वाद आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूजा आणि पंकज या दोघांमध्ये विभक्त होण्यासाठी नेमकी काय कारणे घडली आणि त्याला कोण जबाबदार होते हे कोणीही त्रयस्थ सांगू शकणार नाही. पूजा तडस यांनी पत्र परिषद घेतली, लगेचच पंकज तडस यांनीही माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. रामदास तडस यांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे.
इथे प्रश्न असा येतो की लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात हा कौटुंबिक वाद आणणे कितपत योग्य ठरेल? त्यावर असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो की खासदार हा पूर्ण मतदार संघाचा पालक असतो. खासदाराच्या कुटुंबातच जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होणार असेल तर तो खासदार संपूर्ण मतदारसंघाला कसा न्याय देणार? हा मुद्दाही अगदीच नाकारता येत नाही.
असे असले तरी हा निवडणुकीचा मुद्दा असावा काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. लोकसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर लढली जावी. त्यात राष्ट्रीय मुद्दे विशेषतः राष्ट्रीय समस्या यांची चर्चा व्हावी, आणि सत्तेत येऊ बघणारे पक्ष आणि व्यक्ती त्यावर काय उपाययोजना करणार आहेत यावर चर्चा व्हावी असे अपेक्षित असते. मात्र या निवडणुकीत व्यक्तिगत स्तरावर चर्चा होते आहे. यातून काय साध्य होणार याचाही विचार व्हायला हवा. वस्तुतः या मतदारसंघात महाआघाडीने अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिले आहेत. शिल्लक शिवसेना ही देखील या महाआघाडीचीच एक घटक आहे. अशावेळी शिवसेनेच्या नेत्या असलेल्या सुषमा अंधारे या आपला उमेदवार सोडून एका अपक्ष उमेदवाराची तळी उचलायला येतात आणि त्यासाठी पत्र परिषद घेतात हे काहीसे अनाकलनीय आहे. निवडणुकीचा काळ सुरू होण्यापूर्वी जर सुषमा अंधारे यांनी हा मुद्दा उचलून धरत पूजा तडस यांच्यासाठी पत्र परिषद घेतली असती आणि प्रसंगी आंदोलनही उभे केले असते तर ते काहीसे ग्राह्य मानता आले असते. मात्र यावेळी भाजपच्या उमेदवाराचे चारित्र्यहनन करणे या एकाच हेतूने सुषमा अंधारे पुढे आल्या आहेत. त्यांना पूजा तडस यांचे भले व्हावे याची फारशी काळजी नाही हे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळेच त्यांच्या हेतूबद्दल कुठेतरी शंका निर्माण होते.
आपल्या देशात निवडणुकांमध्ये पूर्वी मुद्यांचे राजकारण व्हायचे. गेल्या काही वर्षात ती पद्धत बदलत गेली आहे आणि गैरमुद्यांवरच राजकारण केले जाऊन निवडणुका लढवल्या जात आहेत. २०१४ मध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदी लोकसभेसाठी उभे राहिले त्यावेळी त्यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी यांच्याबद्दलही विरोधकांनी असेच मुद्दे उपस्थित केले होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि यशोदाबेन मोदी हे गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त झालेले आहेत, आणि त्याबद्दल त्या दोघांनाही काहीही तक्रार नाही. सामान्य जनतेला देखील काही देणे घेणे नाही.मात्र देशातील राजकीय नेतेच त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात आणि मुद्द्यांचे राजकारण सोडून गैरमुद्यांवरच भांडणे सुरू करतात. हे सकस लोकशाहीचे लक्षण मानायचे काय असा प्रश्न निर्माण होतो. आज पूजा तडस यांच्यासाठी आयोजित पत्र परिषदेतही सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदींच्या पत्नीचा मुद्दा उपस्थित केला होता. असे अनाठाई मुद्दे उपस्थित करणे कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा.
पूजा तडस आणि पंकज तडस या दोघांमध्ये नेमके काय घडले हे तयस्थांना माहीत असण्याचे काहीच कारण नाही. अर्थात या प्रकरणात पूजा तडस यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाचे निराकरण व्हायला हवे. एक भगिनी म्हणून त्यांना न्याय मिळायला हवा. यात जर पंकज तडस दोषी असतील तर त्यांनाही उचित शासन व्हायला हवे. त्याचप्रमाणे तडस परिवारातील इतर कोणी मंडळी पूजा तडस यांना त्रास देत असतील तर त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. कायद्याने ती प्रक्रिया पूर्ण करावी. मात्र तो निवडणुकीचा मुद्दा होऊ नये.
आज देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी सर्वच राजकीय नेते आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि विकासाच्या मुद्द्यावरच लोकप्रतिनिधींची निवड व्हावी हे अपेक्षित आहे. निवडणुकीच्या प्रचारात असे सासराविरुद्ध असून हे कौटुंबिक वाद येऊ नये आणि विकासाच्या तसेच प्रगतीच्या मुद्द्यांवरच निवडणुका लढवल्या जाव्या इतकेच इथे सुचवावेसे वाटते.