यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतापुढे कोणाचेच अस्तित्व मान्य नाही. मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपविली, गेली दिडवर्ष आरएसएसचे मोहन भागवत यांनाही ते भेट देत नाहीत. अशावेळी मोदी नावाचे हे भूत लोकशाहीच्या मानगुटीवरून उतरवण्यासाठी आरएसएसने वंचितला पाठींबा द्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

महाविकास आघाडीपासून काडीमोड घेतल्यानंतर आंबडेकर स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यवतमाळ येथे आज पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवलं आहे. मागच्या सहा महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव कुणी वर्तमानपत्रात वाचले का? तसेच मोदींनी भारतीय जनता पक्षालाही संपविले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी हेदेखील स्वतःहून नागपूर येतील संघ कार्यालयात यायचे. पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षात एकही दिवस संघ कार्यालयात आलेले नाहीत. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितला, तेव्हा त्यांना वेळही देण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला संपविले आणि भाजपालाही संपवले. मात्र निवडणुकीसाठी पक्षाचे चिन्ह लागतं. त्यामुळे निवडणुकीत त्याचा वापर करतात, असा आरोप आंबेडकर यांनी केले.

यापुढे संघ आणि सनातन्यांनीच निर्णय घेतला पाहीजे. मोदींचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले हे भूत खाली उतरवले पाहिजे का? हे भूत उतरविण्यासाठी आम्ही तयार आहोत. तशी सुरुवात आम्ही केली आहे. संघाने आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे, असे नाही. याआधीही त्यांनी आरएएस बाबत विधाने केलेली आहे. नुकतेच महाविकास आघाडीबरोबर चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो, असे म्हटले होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “आम्ही सुधारणांमध्ये विश्वास ठेवतो. समाज सुधारणं ही आमची प्राथमिकता आहे. राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना आमचे काही राजकीय अजेंडे असले तरी आमच्यासाठी सामाजिक सुधारणा अधिक महत्त्वाची आहे.”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपल्या देशात जे पुजारी, पुरोहित किंवा धार्मिक विधी करणारी जी मंडळी आहे, ती जातीच्या आधारावर आहे. म्हणजेच आज कुंभाराचा पुरोहित त्यांच्या जातीपुरता, लोहाराचा पुरोहित त्यांच्या जातीपुरता मर्यादित आहे. त्या-त्या पुरोहितांना त्यांच्या त्यांच्या समाजापुरती मान्यता आहे. त्याला इतर समाजात मान्यता नाही. त्यामुळे समाजात समता आणि अधिकार दोन्ही आणायचे असतील तर या क्षेत्रात सुधारणा होणे आवश्यक आहे. कारण हे खूप प्रतिकात्मक आहे.

आम्हाला असे वाटते की, देशात जी जातीवर आधारित पुरोहितशाही चालली आहे ती कायद्याने पूर्णपणे बंद करायला हवी. यावर सरकारने बंदी घालायला हवी. त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी (ब्रह्मज्ञान) उभे केले जावे आणि तिथून शिकून, उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल, जो पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे. धार्मिक विधी त्याच्यामार्फतच केले जायला हवेत. आरएसएस आणि भाजपा जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू शकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *