मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाकामांवर विश्वास ठेऊन आपण भाजपात पुन्हा प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहिर केल्यानंतरही भाजपाचे नेते गिरीश महाजनांनी त्यांच्यावरील टीका सुरुच ठेवली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे काही दिवसांपूर्वीच मोदी यांच्या बद्दल काय काय बोलत होते. त्याच्या क्लीप आपण दाखवू शकतो. मोदी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले आहेत. भाजपामध्ये असताना तीस वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरले आणि एक वेळेलाच आपली कन्या हरल्यानंतर लगेच पक्ष तुमचा दुश्मन झाला आहे. लगेच पार्टी बदल तुम्ही केला. मग आता कसा तुम्हाला मोदी यांचा काम चांगलं असल्याचा साक्षात्कार झाला हे कळत नाही.
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला ही आपली मोठी चूक झाली असल्याची कबुली शरद पवार यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांच्याकडे दिली होती. या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की, बरोबर आहे. त्यांचं काही चूकच नाही. कारण खडसे यांनी आपल्या सोईचे राजकारण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सून एका ठिकाणी, मुलगी एका ठिकाणी, तर ते स्वतः दुसऱ्या ठिकाणी असे सोईचे आणि एकाच घरात सत्ता राहणारे, परिवार वादाचे राजकारण त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. शरद पवार यांना पश्चात्ताप होणारच आहे.
एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये होऊ घातलेल्या प्रवेशाबाबत भाजपावर टीका केली आहे आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध दर्शविला आहे, असे आरोप अंजली दमानिया यांनी केले. त्यांचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावला आहे. अद्याप खडसे यांचा भाजपा प्रवेश झालेला नाही किंवा त्यांना राज्यपाल केले जाणार असल्याचं मला माहित नाही. पक्षाने त्यांना अस सांगितले नाही. अशी गरज सुद्धा पक्षाला नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर गिरीश महाजन म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी आमच्याकडे दोन महिन्यापूर्वी आलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारीसाठी गळ घालून त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र रावेर असो किंवा जळगाव या दोन्ही ठिकाणी आमच्या उमेदवाराला पाच लाखांचा लीड मिळेल, असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.