पनवेल : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर प्रमुख पक्षांसह उमेदवारांकडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. या प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांची पीयूसी, आरसीबुकसह इतर आवश्यक कागदपत्रे आणि चालकांकडेही परवाना असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रचारासंदर्भात आरटीओकडे नियमानुसार शुल्क भरून परवानगी घेणे बंधनकारक आहे; अन्यथा कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी आयोगाकडून खबरदारी घेण्यात येत असून आवश्यक सूचनाही सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांसह अपक्षही उमेदवारांकडूनही प्रचाराला वेग दिला जात आहे. उमेदवाराकडून मतदारसंघातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मावळमध्ये १३ मे रोजी मतदान असून घाटमाथा व पनवेल, उरणची कोकण किनारपट्टी असा मतदारसंघ दोन भागांत विभागला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, उमेदवारांनी यापूर्वीच वाहनांची बुकिंग केली असून प्रचारदेखील सुरू झाला आहे. विधानसभानिहाय प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन, ठिकठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला जात आहे. सर्कलनिहाय कार्यकर्ते कामाला लागले आहेत; मात्र यासाठी लागणाऱ्या वाहनांची कागदपत्रे बरोबर आहेत का? हे पाहावे लागणार आहे.

परवान्यासाठी दोन हजार शुल्क

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी लावण्यात येणाऱ्या वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनांना जवळपास दोन हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. परवानगी न घेता प्रचार करण्यात येत असल्याचे लक्षात येताच आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यावरून कारवाई केली जाणार आहे. यामुळे प्रचारासाठी वाहन लावताना अगोदर वाहनांची परवानगी घेऊनच नंतर प्रचारात सहभागी होता येणार आहे.

वाहनाचे पीयूसी, आरसी बुक, फिटनेस सर्टिफिकेटसह प्रशिक्षित आणि उपप्रादेशिक कार्यालयाने दिलेला चालकाचा परवाना आहे का, हे तपासावे लागणार आहे. तसे नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. पनवेल, उरण व कर्जत या तीन विधानसभा क्षेत्रांसाठी एक खिडकीअंतर्गत एक एक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

– गजानन ठोंबरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *