पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर सामान्य लोक आणि मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात आहेत. अनेक ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. दर दुसरीकडजे महायुतीकडून राज ठाकरेंचे आभार मानले जात आहेत. आज शरद पवारांनी मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेवर मिश्कील शब्दात टपली मारली.
राज ठाकरेंचे तीन-चार निर्णय मी दहा पंधरा वर्षात पाहिले. कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसात काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करु शकतील. अनेक संस्था काम करत असतात, एजन्सीज काम करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला का? हे काही मला माहीत नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत सामान्य माणसं संभ्रमात आहेत असं प्रश्न पत्रकाराने थेट शरद पवारांना विचारलं असता “मी पण सामान्य नागरिक आहे” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आणि पत्रकार परिषदेत सगळ्यांनाच हसू अनावर झालं.