अशोक गायकवाड

रायगड : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील मौजे वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि.8 एप्रिल पासून ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंघ) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही सदर कालावधीकरीता वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. वरंध घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग वापराबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *